Pune Bypoll election : टिळक कुटुंबियांना डावलण्यापासून तर जगताप कुटुंबियांच्या वादापर्यंत; उमेदवार जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक या दोघांना पक्षात योग्य ते स्थान आणि सन्मान देण्यात येईल, असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
Pune Bypoll election : मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक या दोघांना पक्षात योग्य ते स्थान आणि सन्मान देण्यात येईल, असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केलं आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर टिळक कुटुंबीयांना डावलल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यातील (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणुकीचे (Kasba Bypoll Election) उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, काल (3 फेब्रुवारी) रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरी वाड्यात जाऊन शैलेश टिळकांची भेट घेतली. त्यांनी उमेदवारी आणि पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर उमेदवारीची घोषणा केली. कुणाल टिळक आणि शैलेश टिळक या दोघांनीही भाजप पक्षात योग्य ते स्थान देईल, बरोबरीचं स्थान देईन आणि मानाचं स्थान देईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच शैलेश टिळक आणि कुणाल टिळकांनी देखील पक्षाचा आदेश अंतिम असेल. त्या आदेशाचा आम्ही मान राखू, असं स्पष्ट केलं होतं. कसबा निवडणुकीच्या प्रमुख आमदार माधुरी मिसाळ असतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात उमेदवारी वरुन वाद सुरू असल्याच्या चर्चा होत्या. पत्नी अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरुन वाद सुरू असल्याची चर्चा होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उमेदवारीवरुन जगताप कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद झाला नाही. मात्र लोकांनी वादाच्या चर्चा केल्या. लक्ष्मण जगतापांचा मुलगा वयाने लहान आहे. मात्र त्याने काल मोठी कामगिरी केली आहे. त्याने फेसबुकवर संपूर्ण कुटुंबियांचा एकत्र फोटो पोस्ट केला आणि आम्ही कायम एकत्र आहोत असा आशय लिहिला. यावरुन त्यांच्या कुटुंबात कोणताही वाद नव्हता हे स्पष्ट झाल्याचं ते म्हणाले. या निवडणुकीचा प्रमुख म्हणून शंकर जगताप यांच्या नावाची त्यांनी घोषणा केली.
भाजपचे ठरले मात्र मविआचे उमेदवार कोण?
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा मतदारसंघ हा राष्ट्रावादी काँग्रेसला सुटला आहे. तर चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर चिंचवडमधून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना मौदानात उतरवण्यात आले आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.