(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Indrayani River pollution : माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आळंदीच्या इंद्रायणी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणार
देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषित झाल्याचे वृत्त एबीपी माझानं दाखवलं होतं. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. पुण्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने आळंदीच्या इंद्रायणी नदीची पाहणी केली आहे.
Pune Indrayani River pollution : देवाच्या आळंदीत (Alandi) इंद्रायणी नदी प्रदूषित झाल्याचे वृत्त एबीपी माझानं दाखवलं होतं. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. पुण्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी आळंदीच्या इंद्रायणी नदीची पाहणी केली आहे. त्यांनी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. इंद्रायणी नदीवर रसायनयुक्त पाण्याचा फेस तयार झाला आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रचंड प्रमाणात प्रदुषित झाली आहे. नदीची दयनीय अवस्था झाली आहे.
पुण्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळने इंद्रायणी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यांनी नदीचे विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेतले आहेत. त्यानुसार तपासणी करणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्या परिसरात रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जाते, हे यातून लवकरच समोर येणार आहे. लोणावळा शहरातून या इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्या दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेलं रसायनयुक्त पाणी नदीत सोडलं जातं. त्यामुळे नदीत प्रदूषण पसरत आहे. या प्रदुषणामुळे नदीकाठावरील राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ
पुण्यातील देवाच्या आळंदीतील वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानल्या जातं. त्यामुळे लाखो भाविक आळंदीत दर्शनासाठी येत असतात. संजीवन समाधी सोहळा, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला या इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकरी येत असतात. या वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थासमान आहे. अनेक वारकरी या नदीत स्थान करतात शिवाय तीर्थ म्हणून नदीचं पाणी पितात. त्यामुळे ही नदी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. नदीतील प्रदूषण वाढत राहिलं तर अनेक वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो शिवाय मोठ्या प्रमाणात त्वचा रोग होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक वारकऱ्यंकडून नदी स्वच्छ ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
लोणावळा ते आळंदीपर्यंत इंद्रायणी नदीच्या काठी अनेक लहान मोठे गावं आणि शेतीदेखील आहे. त्या गावातील लोक इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वापर करतात. त्यामुळे नदीकाठी वसलेल्या गावकऱ्यांनादेखील या दूषीत पाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांची जनावरेदेखील धोक्यात आली आहेत. या पाण्यामुळे अनेकांची जनावरेदेखील दगावले आहेत. त्यामुळे नदी प्रदुषीत करणाऱ्यांवर नागरिक संतापले आहेत. या नदीत प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते, त्यामुळे या रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्यां कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संबंधित बातमी-
Pune Indrayani River Pollution : देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदीवर साबणाचा फेस; वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ