![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC Men's Cricket World Cup : 27 वर्षांनी पुण्यात रंगणार वर्ल्ड कपचे सामने; पहा संपूर्ण वेळापत्रक...
तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात आयसीसी पुरुष विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे सामने होणार आहेत. त्यासाठी पुण्यातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.
![ICC Men's Cricket World Cup : 27 वर्षांनी पुण्यात रंगणार वर्ल्ड कपचे सामने; पहा संपूर्ण वेळापत्रक... maharashtra news pune news Pune to host ICC Men's Cricket World Cup ICC Men's Cricket World Cup : 27 वर्षांनी पुण्यात रंगणार वर्ल्ड कपचे सामने; पहा संपूर्ण वेळापत्रक...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/447bfd661cc4e468bbc85bd2c191ea211687873897836442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ICC Men's Cricket World Cup : तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात आयसीसी पुरुष विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे सामने होणार आहेत. या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील तीन सामन्यांचे यजमानपद महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला मिळाले आहेत. यात मुख्य आकर्षण भारतीय क्रिकेट संघाचा 19 ऑक्टोबरचा बांगलादेश विरुद्धचा सामना हा असेल. यापूर्वी 1996 च्या (ICC Men's Cricket World Cup ) विश्वचषक स्पर्धेत, 29 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज वि. केनिया हा सामना पुण्यातील नेहरु स्टेडियमवर खेळला गेला होता. केनियाने या सामन्यात 166 धावात खुर्दा उडूनही वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला होता.
"विश्वचषक स्पर्धेचे 27 वर्षांनी पुण्यात आयोजन होणार आहे. भारतीय संघाचे सामने आयोजित करणे ही कायमच आनंदाची बाब असते आणि विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करणे ही तेवढीच आनंददायी आणि आव्हानात्मक गोष्ट आहे. ही संधी आम्हाला मिळाली हा आम्ही आमचा सन्मान मानतो," महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले.
"महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला आणि पर्यायाने पुण्याला विश्वचषक आयोजनाची संधी दिल्याबद्दल आम्ही बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचे विशेष आभार मानतो. अन्य राज्य संघटना देखील या सामन्यांच्या आयोजनासाठी कसोशीने प्रयत्न करत होत्या. परंतु बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आयोजन क्षमतेवर विश्वास दाखवला याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो," असे रोहित पवार म्हणाले.
पवार यांनी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, खजिनदार आशिष शेलार, उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे देखील आभार मानले. त्याचबरोबर रोहित पवार यांनी आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचेही विशेष आभार मानले. "पवार साहेबांनी कायमच महाराष्ट्र क्रिकेटच्या बाबतीत दुरदृष्टी दाखवली आहे. त्यांनी विश्वचषकाचे सामने पुण्यात व्हावे यासाठी आमची बाजू बीसीसीआय समोर मांडली तसेच आमची शिफारस देखील केली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे," असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी या वेळी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघात निवड झालेल्या ऋतुराज गायकवाडचेही अभिनंदन केले. ऋतुराज गुणी फलंदाज आहे. विंडीज दौऱ्यात तो यशस्वी होईल आणि विश्वचषक संघातही दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत आपला केदार जाधव सहभागी होता. यंदा घरच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत देखील आपले अनेक खेळाडू दिसतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पुण्यातील वर्ल्ड कपचे सामने
ऑक्टो. 19: भारत वि. बांगलादेश
ऑक्टोबर 30: अफगाणिस्तान वि क्वालिफायर 2
नोव्हेंबर 1: न्यूझीलँड वि दक्षिण आफ्रिका
नोव्हेंबर 8: इंग्लंड वि क्वालिफायर 1
नोव्हेंबर 12: ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश.
सर्व सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील. मात्र ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश सामना सकाळी 10.30 ला सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)