Maharashtra Political Crisis: शिवसेनेवरील संकट टळण्यासाठी पुण्यात शिवसैनिकांकडून 'महाआरती'
शिवसेना पक्षावर सध्या संकटाचं वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेचं हे संकट टाळण्यासाठी पुण्यात शिवसैनिकांकडूम महाआरती करण्यात आली. पुण्यातील येरवडा परिसरात ही महाआरती करण्यात आली.
Maharashtra Political Crisis: शिवसेना पक्षावर सध्या संकटाचं वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेचं हे संकट टाळण्यासाठी पुण्यात शिवसैनिकांकडूम महाआरती करण्यात आली. पुण्यातील येरवडा परिसरात ही महाआरती करण्यात आली. नगर विकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीने शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. गेल्या चार दिवसांपासून अनेक आमदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता दूर व्हावी, यासाठी राज्यभरातून शिवसैनिक वेगवेगळ्या प्रकारे शक्तीप्रदर्शन करत आहेत.
गुवाहाटीत गेलेले 40 आमदार हे शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करत नाही. हे 40 आमदार म्हणजेच शिवसैनिक आहेत आणि तेच म्हणजे शिवसेना आहे, असं अजिबात नाही. एक-दोन नाही तर तब्बल चार कोटी शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहोत. आमच्या भावना त्यांच्यासोबत जुळल्या आहे आणि आमच्या ताकदीवर शिवसेना ही चिरकाल टिकणार आहे, असा विश्वास पुण्यातील शिवसैनिकांनी दर्शवला आहे.
यापुर्वी देखील शिवसेनेतील चार बडे नेते फुटले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेटत नाही असा आरोप त्यांच्यावर पत्रामार्फत केले होते. त्यावर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच कोरोनाचा काळ सुरु झाला होता. त्यामुळे ते अनेकांना भेटू शकले नाही. त्यानंतर देखील त्यांनी त्यांचं काम चोख केलं आहे. एखादा माणूस भेटत नाही म्हणून तुम्ही निष्ठा कशी कमी करु शकता?, असा सवाल देखील यावेळी शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे जर नेत्यांना कार्यकर्त्यांना भेटत नाही, असं असेल तर त्या सगळ्या आमदारांनी थांबायला हवं होतं. गेले 35 वर्ष झाले आम्ही सेनेचं काम करतो. मात्र आम्ही कधीच मातोश्रीवर भेटायला गेलो नाही. तरीही आमची कामं कधीच अडली नाही. त्यामुळे आमदारांनी केलेलं हे कृत्य नीट नाही, असंही शिवसैनिक म्हणाले.
शिवसेनेकडूनही आता या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. आतापर्यंत 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.