Pune news : लॅम्बोर्गिनीची भरधाव राईड पडली महागात; कुत्र्याचा मृत्यू, चालकास पोलिसांनी शिकवला धडा
पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील श्वानाच्या मृत्यूप्रकरणी लॅम्बोर्गिनी चालकास पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी लॅम्बोर्गिनी जप्त केली आहे.
पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील श्वानाच्या (Pune Crime News) मृत्यूप्रकरणी लॅम्बोर्गिनी चालकास पोलिसांनी आणि प्राणीप्रेमींनी चांगलाच धडा शिकवला आहे. डेक्कन परिसरातील गुडलक कॅफेसमोर 5 ऑगस्ट रोजी मोटारीने श्वानाला धडक दिली होती. त्यात एका आठ वर्षीय श्वानाचा मृत्यू झाला होता. डॉन असं या कुत्र्यांचं नाव होतं. पुण्यातील प्राणीप्रेमींनी एकत्र येत लॅम्बोर्गिनी चालकाला धडा शिकवण्याचं ठरवलं आणि त्यांनी चालकाविरोधात तक्रार दाखल केली.
पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक प्रसाद वसंत नगरकर यांची ही लॅम्बोर्गिनी कार होती. या कारने डेक्कन परिसरातील गुडलक कॅफेसमोर 5 ऑगस्ट रोजी मोटारीने श्वानाला धडक दिली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहून सराफ व्यावसायिक प्रसाद वसंत नगरकर यांच्यावर 9 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या व्यावसायिकाला अटक करून ती मोटार जप्त केली. पोलिसांनी मोटारचालकास नोटीस बजावून रविवारी सोडून दिलं. तसेच, आरटीओच्या तपासणीनंतर कार त्यांच्या ताब्यात दिली. या कारची किंमत सुमारे चार कोटी आहेत.
प्राणी प्रेमींनी प्रकरण लावून धरलं अन्...
5 ऑगस्टला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गुडलक चौकात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी चार चाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नीना नरेश राय (वय 57) या महिलेने या प्रकरणी तक्रार दिली होती. फिर्यादी या सामाजिक कार्यकर्ते आहेत. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता तितक्याच वेगाने पळून गेला होता. घटनेनंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. मात्र सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली होती. मात्र फिर्यादी आणि अन्य काही लोकांनी प्रकरण लावून धरल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पुणेकर अन् वसंत मोरेंकडून गुडलक चौकात श्वानाला श्रद्धांजली...
आम्ही ही एक जीव आहोत... आम्हाला ही जगण्याचा अधिकार आहे... असं म्हणत पुण्याच्या गुडलक चौकात श्वानप्रेमी पुणेकरांनी या डॉन नावाच्या कुत्र्याला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर वसंत मोरेंनीदेखील या डॉनला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. 'विषय डॉन च्या मृत्यूचा नाही आज डॉनच्या जागी एखादा माणूसही असू शकला असता मग काय याने त्यालाही चिरडलं असतं का? या बड्या बापांच्या औलादिंचे डोकं ठिकाणावर आणायला हवं. रस्ता हा पुणेकरांचा आहे याच्या बापाचा नाही याला धडा शिकवणारच, अशा खड्या शब्दांत वसंत मोरेंनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
वसंत मोरे पोस्ट करत संतापले...
मनसे नेते वसंत मोरे यांनी या लॅम्बोर्गिनी चालकावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी चालकाला धडा शिकवण्यासाठी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, पुण्याच्या गुडलक चौकातील 'डॉनला' भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचं झालं असं 5 ऑगस्टला दुपारी 2 वाजता पुण्यातील गुडलक चौकात डॉन रस्त्याच्या कडेला नेहमीप्रमाणे झोपला होता आणि अचानक पुण्यातील एका नामांकित सोन्याच्या दुकानाच्या मालकाच्या जहागीरदार पोराची 4 कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी गाडी आली, सिग्नल पडला होता म्हणून हा जहागीरदार लोकांना समजावं हा कोण आहे म्हणून याची महागडी गाडी रेस करत होता. त्यामुळे रस्त्याकडेला झोपलेल्या डॉनची झोपमोड झाली आणि तो त्या आवाजाच्या दिशेने धावला. टायरला तो आता चावतो की काय माझ्या गाडीचे नुकसान करतो की काय या भीतीने या मोठ्या बापाच्या लेकाने त्याला त्याच्या गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली घेतला. थोडा थांबला असता तर कदाचित डॉन वाचला ही असता पण या मोठ्या बापाच्या औलादीने गाडी तशीच पुढे रेटली आणि डॉनचा जीव घेतला. काही डॉग लव्हरने याची तक्रार डेक्कन पोलीस स्टेशनला केली पण न्याय मिळत नव्हता. मी काल जाऊन आलो आणि आज या बड्या बापाच्या औलादीची गाडी थोडा वेळ पोलीस स्टेशनला आणून लावली पण काय झालं माहित नाही गाडी परत गेली आहे, या लॅम्बोर्गिनी चालकाला धडा शिकवलाच पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या :
अहमदनगरमध्ये लम्पी आजाराने पुन्हा डोकं वर काढलं; राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगावमध्ये विळखा वाढल