अहमदनगरमध्ये लम्पी आजाराने पुन्हा डोकं वर काढलं; राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगावमध्ये विळखा वाढला
Ahmednagar Lumpy Skin Disease : जनावरांमधील लम्पी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात वाढू लागला आहे.

अहमदनगर : मागील वर्षी लसीकरणामुळे कमी झालेला जनावरांमधील लम्पी त्वचा आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव पुन्हा एकदा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात वाढू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात 239 गावात 1 हजार 174 जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यातील 19 जनावरे गंभीर अवस्थेत असून 53 जनावरांचा मृत्यू झाला. राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढते आहे. शेतकर्यांनी, पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरु केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.
पावसाळ्यानंतर लम्पीचा प्रादुर्भाव वाढला
गेल्या मे 2023 मध्ये जिल्ह्यात केवळ 4 जनावरांना लागण झालेली आढळली होती, परंतु पावसाळा सुरु झाला तसा 15 जूननंतर लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. पावसाळ्यात कीटक, चिलटे, डास माशांचे प्रमाण वाढू लागले तसे जनावरातील लम्पीचा आजार बळावत चालला. जिल्ह्यात 239 गावात लम्पीचा प्रादुर्भाव असून सर्वाधिक रुग्णसंख्या शेवगाव 279, राहुरी 269,कोपरगाव 183,पाथर्डीत 134 आहे.
मालेगावात लम्पी सदृश रोगाचा जनावरांना पुन्हा धोका
मालेगावातजनावरांना लम्पी स्किन आजाराची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम व्यापक करण्यात आली आहे. नाशिकच्या मालेगावात 1 लाख 10 हजार 134 पशुधनापैकी 32 पशू वैद्यकीय दवाखान्यातून 65 हजार 500 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले असून उर्वरित जनावरांचे देखील लसीकरण लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ.जावेद खाटीक यांनी दिली. मालेगावातील टाकळी गावात 11 जुलैला एक बैल जातीच्या जनावराला लम्पी सदृश रोगाची लागण झाली होती मात्र उपचारानंतर बैल पूर्णपणे बरा झाला आहे. मागील लसीकरणाचा मोठा फायदा झाल्याने यंदा जास्त प्रमाणात लम्पी सदृश जनावरे आढळले नाही. मागील वर्षी लम्पी रोगाच्या साथीत मालेगावात 13 जनावरे दगावली होती. दरम्यान, लम्पी हा व्हायरल विषाणूजन्य रोग असून लसीकरण आणि वेळीच उपचार घेतल्यास रोग बरा होऊ शकतो, असे पशुधन विकास अधिकारी डॉ.जावेद खाटीक यांनी सांगितले.
लम्पी आजार म्हणजे काय?
लम्पी हा एक त्वचारोग आहे. प्रामुख्याने जनावरांमध्ये लम्पी आढळतो. 1929 मध्ये दक्षिण आफ्रिकेत या रोगाचा शोध लागला. 2012-13 नंतर लम्पी रोग भारतात आढळला. महाराष्ट्रात गडचिरोलीत या रोगाची सुरुवात झाली. लम्पी हा संसर्गजन्य रोग असून एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला त्याची लागण होते. गायींना लम्पी रोगाची जास्त लागण होते. कमी वयाच्या जनावरांमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते. संकरित जनावरांमध्ये या रोगाचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. बाधित जनावरांचा मृत्यू झाल्यात खोल खड्डयात मृतदेहाची विल्हेवाट लावावी. मृत जनावरांच्या ज्या खड्ड्यात पुरणार तिथे चुन्याची पावडर टाकावी.
हेही वाचा
Latur News: काय सांगता आता लम्पीचीही 'दुसरी लाट', पशुपालकांमध्ये चिंता; लसीकरण करून घेण्याचे आवाहन


















