Leshpal Javalge Pune : लेशपाल 'तिची' जात कोणती?, सदाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालला मेसेजद्वारे विचारणा, इन्स्टा स्टोरी चर्चेत
पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवरील हल्ला आपल्या अंगावर झेलणारा लेशपाल जवळगेला आता मेसेज करुन मुलीची जात कोणती, असे प्रश्न विचारले जात आहे
Leshpal Javalge Pune : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवरील हल्ला आपल्या अंगावर झेलणारा लेशपाल जवळगेला आता मेसेज करुन मुलीची जात कोणती, असे प्रश्न विचारले जात आहेत. हल्ला होताना दाखवलेल्या धैर्याचं सगळीकडून कौतुक होताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्याची इन्स्टा स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे. त्याच्या या इन्स्टा स्टोरीत त्याने नागरिकांना किंवा मुलीची जात विचारणाऱ्यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे. तरुणीवर तरुणाने कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाल्यानंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) झाला होता. त्यानंतर लेशपाल सगळीकडे चर्चेत आला. त्याचं सर्व राजकारण्यांकडून आणि महाराष्ट्रातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
काय लिहिलंय स्टोरीमध्ये?
मुलीची आणि मुलाची जात कुठली होती, असं मला मेसेज करुन विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलीट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला कीड लागली आहे, असं स्टोरीमध्ये त्याने लिहिलंय.
राजकीय नेत्यांकडून बक्षीस आणि भरभरुन कौतुक
लेशपालने दाखवलेल्या धैर्यामुळे आज एका मुलीचा जीव वाचला. त्याने जर त्यावेळी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर आज शिक्षणाच्या माहेरघराला डाग लागला असता. मात्र त्याच्यामुळे आज ती मुलगी जिवंत आहे. त्याच्या या कार्याचं सगळीकडून कौतुक होत आहे. खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खास ट्वीट करत त्याचं कौतुक केलं आहे तर जितेंंद्र आव्हाड यांनी त्याला 50 हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
पुण्यातील सदाशिव पेठेत दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर तिच्या मित्राने कोयत्याने हल्ला करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण एमपीएससीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत हल्लेखोर तरुणाला रोखलं. सदाशिव पेठेतील गर्दीच्या ठिकाणी हा प्रसंग घडल्यावर देखील बराच वेळ पोलिसांचा पत्ता नव्हता असं स्थानिकांचं म्हणणं आहे. यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे पोलीस नक्की काय करत आहेत?, असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.
हेही वाचा-