(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune NCP : पुण्यातील पावसानंतर राष्ट्रवादी अॅक्शन मोडमध्ये; नुकसानग्रस्त परिसराची पाहणी
पुण्यातील काही भागांमध्ये पावसामध्ये झालेल्या नुकसानाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने पाहणी केली. त्यात पुण्यातील रेल्वे स्टेशनच्या परिसराची देखील पाहणी केली.
Pune NCP : पुण्यातील काही भागांमध्ये पावसामध्ये झालेल्या नुकसानाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने पाहणी केली. त्यात पुण्यातील रेल्वे स्टेशनच्या परिसराची देखील पाहणी केली. त्यावेळी व्यापाऱ्यांची चौकशी केली असता महापालिकेकडून कोणतीही मदत न झाल्याचं चित्र निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने पाच वर्ष सत्तेवर असलेल्या भाजपवर केला आहे.
सोमवारी झालेल्या पावासामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी शिरलं. त्याचप्रमाणे पुणे स्टेशनजवळ्या पूलाच्या खालच्या भुयारी मार्गात असलेल्या मार्केटमध्ये देखील 4 फुटांपेक्षा जास्त पाणी साचलं होतं. या मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या वस्तूंची दुकानं आहेत. अनेक लहान-मोठे व्यापारी परिसरात आपला व्यावसाय करतात. याचं महापालिकेला भाडं देखील देतात. मात्र पावसामुळे या मालाचं देखील नुकसान झालं आहे. मात्र महापालिकेतील कोणीच या ठिकाणी मदतीस आले नसल्याचं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे.
पावसामुळे या भागात पाणी साचलं. व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र वारंवार सांगूनही या ठिकाणी कोणीही स्वच्छतेसाठी देखील आलं नाही. महानगरपालिकेच्या वतीने याठिकाणी भाडे/टॅक्स घेतले जाते. मात्र त्यांच्या समस्यांवर नीट लक्ष दिलं जात नाही, अशी तक्रार तेथील सर्व व्यापाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. त्यानुसार या परिसराची त्यांनी पाहणी केली.
जबाबदार कोण?
पावसामुळे अनेक परिसरातील लोकांचं मोठं नुकसान झालं. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार वाहून गेल्याचं चित्र होतं. यांच्या समस्या सोडून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना पुण्यातील परिस्थितीसाठी जबाबदार ठरवताना दिसत आहे. या नेत्यांच्या या राजकारणात सामान्य नागरीकांचं मोठं नुकसान होत आहे. अनेक परिसरात अजूनही नागरिक त्रस्त आहेत. ऐन दिवाळीत संसार उद्ध्वस्त झाल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुण्याच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या समस्येवर काम करणं लोकप्रतिनिधींचं काम असतं मात्र ते एकमेकांना जबाबदार ठरवून परिस्थितीतून हात काढून घेत असल्याचं चित्र आहे.
पावसावरुन आरोप-प्रत्यारोप
पुण्याच्या पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे राजकीय नेत्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली होती. माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात ट्विटर वॉर बघायला मिळाला. मुरलीधर मोहोळ यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत निशाणा साधला होता. बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला? अशा प्रकारचे प्रश्न विचारत मुरलीधर मोहोळांनी शहरातील रखडलेल्या कामांवरुन त्यांना जाब विचारला आहे.