पुण्यात 14 वर्षीय मुलीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून तब्बल 44 वार करून निर्घृण हत्या
पुण्यातील बिबवेवाडी परीसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून धारधार कोयत्याने तब्बल 44 वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय.
पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परीसरात एका 14 वर्षीय मुलीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून धारधार कोयत्याने तब्बल 44 वार करून निर्घृण हत्या करण्यात आलीय. ही घटना बिबवेवाडी परीसरात असलेला यश लॉन्स येथे घडलीय. पोलिसांनी या प्रकरणात ऋषिकेश भागवत या 22 वर्षांच्या तरुणाला अटक केली असुन हत्येसठी त्याला मदत करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
यातील मुख्य आरोपी हा मृत मुलीचा चुलत मावस भाऊ असुन गेल्या काही काळापासून तो तिला त्रास देत होता. मात्र, मुलीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा राग त्याच्या मनात होता. या रागातुन त्याने थंड डोक्याने सदर मुलीची हत्या करण्याचा कट रचला. सदर मुलगी आठवीत शिकत होती आणि स्थानिक कबड्डी संघाची ती खेळाडूही होती. ती दररोज संध्याकाळी कबड्डीच्या सरावासाठी यश लॉन्स या मैदानावर जायची. आरोपी ऋषिकेश भागवतने तिच्यावर पाळत ठेवून ती कबड्डी खेळायला किती वाजता येते याची माहिती काढली. हत्येच्या आधी काही दिवस हेल्मेट घालून तो मैदानावर गेला आणि त्याने हत्येची रेकी देखील केली. त्यानंतर त्याने धारदार शस्त्रे जमवायला सुरुवात केली. हत्यारे जमल्यावर तो मंगळवारी संध्याकाळी त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांसह मैदानावर पोहचला आणि संधी साधून त्याने अचानक मुलीवर हल्ला चढवला.
यावेळेस मृत मुलीसोबत कबड्डी खेळणाऱ्या इतर मुलींनी ऋषिकेश भागवतला अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यासोबत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी हल्ला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलींवर सोबत आणलेली खोटी पिस्तुले रोखली. दुसरीकडे ऋषिकेश भागवतने कोयत्याने त्या मुलीवर सपासप वार केले. तब्बल 44 वार करुन त्याने मुलीची हत्या केली आणि तो पसार झाला. त्यानंतर तो पुण्यातील कात्रज भागात लपून बसला होता. रात्रभर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर सकाळी तो पोलिसांना एका दुकानाच्या बाजुला लपून बसलेला आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने त्याच्यासोबत हत्येत सहभागी असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांची नावेही सांगितली. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा प्रयत्न करणार असल्याच म्हटलंय.