Ajit Pawar: इंदापुरात अजितदादा, भरणे व्यासपीठावर तर सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील प्रेक्षकांत बसले; भावा-बहिणीचा अबोला ठरला चर्चेचा विषय
Ajit Pawar: इंदापुरातील सरकारी कार्यक्रमात नाराजीनाट्य दिसून आलं, सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं तर अजित पवार आणि भरणे व्यासपिठावर दिसून आले.
पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापुरमध्ये एका कार्यक्रमात मोठं नाराजीनाट्य पाहायला मिळालं. इंदापुरात आयोजित अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते. सरकारी कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला न गेल्याबद्दल सुळेंनी नाराजी व्यक्त केली.
सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी
सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत, तरीही त्यांच्या नावाचं निमंत्रण या कार्यक्रमात नव्हतं. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी त्यांनी स्थानिक मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतर नेत्यांशी संवाद साधला, परंतु अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात दुरावा पाहायला मिळाला. दोघांनी एकमेकांशी संवाद साधणं टाळल्याचं दिसून आलं.
सुप्रिया सुळे यांनी अनेक वेळा राज्यभरातील सरकारी कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण न दिल्याचा आरोप केला आहे. या कार्यक्रमात देखील त्यांचा सत्कार प्रेक्षकांच्या पंक्तीमध्ये बसून करण्यात आला आहे. दरम्यान इंदापुरातील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हजर होते. इंदापूर तालुका बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. पण त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. त्याबद्दल त्यांनी नाराजी बोलून दाखवली.
भावा-बहिणीचा अबोला ठरला चर्चेचा विषय
इंदापूरात उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, माझी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे इंदापुरातील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या उद्घाटनाला उपस्थित होते.ल सुप्रिया सुळे आणि दत्तात्रय भरणे यांनी या कार्यक्रमावेळी संवाद साधला. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचा देखील संवाद झाल्याचं दिसून आलं, पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ-बहिणीतील अबोला आजच्या या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला.