Pune Rapido News : पुण्यातील 'रॅपिडो'ला हायकोर्टाचा दणका; तडकाफडकी सर्व सेवा बंद करण्याचे आदेश
Pune Rapido News : पुण्यातील 'रॅपिडो'ला हायकोर्टाने जोरदार दणका दिला आहे. बाईक टॅक्सीची सेवा पुरवणाऱ्या कंपनीला त्यांच्या सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहे.
Pune Rapido News : पुण्यातील 'रॅपिडो' (rapido) ला हायकोर्टाने जोरदार दणका दिला आहे. बाईक टॅक्सीची सेवा पुरवणाऱ्या कंपनीला त्यांच्या सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आज दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद करा, असं हायकोर्टाने रॅपिडोला खडसावलं आहे. मागील काही दिवसांपासून रॅपिडो सेवा बंद करण्याची मागणी रिक्षाचालकांकडून केली जात होती. या रिक्षाचालकांच्या (rikshaw) मागणीला यश आलं आहे.
पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सी कंपनीला सेवा बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर 20 जानेवारीपर्यंत राज्यभरातील सर्व सेवा बंद करण्याची तयारी सुरु आहे. यासंदर्भात पुढील शुक्रवारी (20 जानेवारी) पुन्हा सुनावणी होणार आहे. पुण्यातील नागरिकांनी दुचाकी आणि तीन चाकी टॅक्सीचा उपयोग करु नये, अशा सूचना आरटीओकडून करण्यात आल्या होत्या. दुचाकी आणि तीन चाकी रॅपिडो टॅक्सींना प्रवास वाहतूक करण्याची परवानगी नाकारली होती. त्यामुळे नागरिकांनी रॅपिडो अॅपचा वापर करुन प्रवास करु नये, असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते.
'बाईक टॅक्सी'बाबत एक स्वतंत्र समिती
राज्य सरकारने 'बाईक टॅक्सी'बाबत एक स्वतंत्र समिती तयार केली आहे. ही समिती लवकरच याबाबत आपला अहवाल सादर करेल. मात्र तोपर्यंत ही सेवा तात्काळ बंद करण्याची राज्य सरकारची मागणी आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, महाराष्ट्र राज्यात शासनाने किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशाप्रकारची कोणतीही योजना अद्याप राबवलेली नव्हती आणि बाईक टॅक्सी प्रकारचा परवाना जारी केला नव्हता. तसेच बाईक टॅक्सीबाबत भाडे आकारणी धोरण अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे 'बाईक टॅक्सी'बाबत एक स्वतंत्र समिती तयार केली आहे.
रॅपिडोच्या मालकावर गुन्हा; डिलिव्हरी या सेवाही विनापरवाना
बाईक टॅक्सीसोबत कंपनीची रिक्षा, डिलिव्हरी या सेवाही विनापरवाना असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काही दिवसांता यांच्यासंदर्भात देखील योग्य निर्णय घेण्याची शक्यता आहे. बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या संचालकांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात बंडगार्डन पोलिसांनी कलमवाढ केली होती. त्यानुसार रॅपिडो कंपनीच्या संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेकायदा बाईक टॅक्सी शहरात चालवणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या मूळ मालकांवर गुन्हे दाखल झाले होते.
रिक्षाचालकांच्या मागणीला यश
मागील काही दिवसांपासून रॅपिडो बंद करा, अशी मागणी रिक्षाचालकांनी लावून धरली होती. रिक्षाचालकांनी बंद पुकारत आणि आंदोलन करत रॅपिडोचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षाचालकाच्या आंदोलनाता तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतरही रॅपिडो सुरु असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे रिक्षाचालक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले होते. 13 डिसेंबरला त्यांनी चक्का जाम करत आंदोलन केलं होतं. या आंदोलनापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र तरी देखील रिक्षाचालक रॅपिडोसंदर्भात आक्रमक झाल्याचं चित्र होतं. त्यांच्या मागणीला आता यश आलं आहे.