शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड, आरोपीच्या मारहाणीत दोन्ही डोळे निकामी
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड करण्यात आली. महिलेने विरोध केल्यामुळे आरोपीने तिला जबर मारहाण केली. यात तिचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत.
पुणे : विनयभंगाचा विरोध केल्याने आरोपीने केलेल्या मारहाणीत महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात मंगळवारी (03 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी पसार झाला असून शिरुर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे घटना? न्हावरे गावात मंगळवारी रात्री हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 37 वर्षीय महिला घराशेजारीच शौचासाठी गेली होती. परंतु यावेळी जवळच्याच झुडपात दबा धरुन बसलेल्या आरोपीने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने छेडछाडीला विरोध केल्याने आरोपीने तिला जबर मारहाण केली. यात महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. पीडित महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. शिरुर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात विनयभंग आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेवर हा जीवघेणा हल्ला कोणी आणि कशासाठी केला याचा तपास शिरुर पोलीस करत आहेत.
"न्हावरे गावात एका महिलेवर अज्ञाताने निर्घृण हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही घटनास्थळी आलेलो असून नेमकं काय घटना घडली याची माहिती घेतली. पोलीस पुढील तपास करत आहेत. लवकरात लवकर आरोपीला अटक करु अशी अपेक्षा आहे," अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.