Guillain Barre Syndrome in Pune: गुलेन बॅरी सिंड्रोममुळे राज्यातला पहिला मृत्यू, सोलापूरच्या तरुणाचा व्हिसेरा तपासणीला पाठवणार
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रूग्णांवरती पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. पुण्यातील रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे.
सोलापूर: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) लागण झाल्यानंतर सोलापूरमधील खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्या तरुणाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुण्यातील धायरी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता.
हा रुग्ण 18 जानेवारीला सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होतं असल्याने खासगी रुग्णालयात दाखल झाला. सुरुवातीला त्याला रुग्णालयातील ICU मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने साध्या रूममध्ये रुग्णास हलवण्यात आले होते. मात्र, काल अचानकपणे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा एकदा ICU मध्ये भरती करण्यात आले. यानंतर उपचारदरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली होती याची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. त्याशिवाय रुग्णाचा व्हीसेरा देखील पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे
या रुग्णाचा मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतीत प्राथमिक माहिती ही शमविच्छेदन आणि व्हिसेरा तपासणी अहवालानंतरच प्राप्त होईल.
मात्र, GBS बाबतीत कोणीही अफ़वा पसरवू नये. तसेच लोकांनी घाबरूण जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पुण्यात वास्तव्याला असणारा हा मृत व्यक्ती सनदी लेखापाल (सीए) होता. तो एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व भाऊ, असा परिवार आहे. त्यांना 11 जानेवारी रोजी पुण्यात जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर ही व्यक्ती एका कार्यक्रमानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी गेली होती. यानंतर त्याला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. त्याला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. तसेच त्याला हातपाय हलवता येत नव्हते. पाच दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने शनिवारी त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर हलवण्यात आलं होतं. मात्र, काही वेळातच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )