Pune Rain : पुणेकरांनो गरज नसेल तर घराबाहेर पडू नका! शाळा तीन दिवस बंद, पर्यटन स्थळांवरही जमावबंदी
अतिवृष्टीच्या काळात कोणतीही दुर्घटना होऊ नये आणि पर्यटन स्थळी नागरिकांनी गर्दी करु नये यासाठी अनेक पर्यटन स्थळावर कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Pune Rain Update: पुणे (Pune) जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या काळात कोणतीही दुर्घटना होऊ नये आणि पर्यटन स्थळी नागरिकांनी गर्दी करु नये यासाठी अनेक पर्यटन स्थळावर कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
सिंहगड किल्ला,आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक मावळ, किल्ले लोहगड, ्किल्ले विसापुर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग,डयुक्सनोज, भान लेणी,भाजे धबधबा, दुधी वरेखिंड,पवना परिसर, मावळमधील राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा,कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी, मुळशी परिसरातील अंधारबन ट्रेक,प्लस व्हॅली,कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड भोर, रायरेश्वर किल्ला, किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर,मढेघाट जुन्नरमधील किल्ले जीवधन, बलीवरे ते पदरवाडी,भिमाशंकर ट्रेक (बैलघाट शिडीघाट,गणपती मार्ग) या सगळ्या ठिकाणी कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
गेले काही दिवस झाले पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक पर्यटन स्थळी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातही झाले. दोन दिवस पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
असे असणार नियम
पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
पुण्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून खासगी कंपन्याना 'वर्क फ्रॉम होम' द्या, असं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिकेने ट्विट करत हे आवाहन केलं आहे. त्याच बरोबर सगळ्या नागरिकांना देखील सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.