....म्हणून जुन्नर मधील 'त्या' फ्लेक्सची राज्यभर चर्चा
जुन्नर एसटी स्टँड समोरच फ्लेक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण या फ्लेक्सवर तब्बल साडे सहा हजार हितचिंतक या झळकवले आहेत
पुणे : पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील 125 फुटी फ्लेक्स राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय. एक दोन नव्हे तर तब्बल साडे सहा हजार फोटो या फ्लेक्सवर झळकवले आहेत. केवडी गावचे सरपंच अमोल लांडेंची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाली. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी जुन्नर एसटी स्टँड समोरच हा फ्लेक्स लावण्यात आला. 125 फूट रुंद आणि 22 फूट उंचीचा हा फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. एक ही हितचिंतक नाराज होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली. म्हणूनच साडे सहा हजार हितचिंतक या फ्लेक्सवर झळकवले आहेत. त्यांच्यासह प्रमुख नेत्यांचे फोटो लहान असल्याने, त्यांचे चेहरा स्पष्टपणे दिसत नाही हा भाग गौण आहे. मात्र या फ्लेक्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, राज्यभर हा फ्लेक्स चर्चेचा विषय ठरला आहे.
अमोल लांडेचा मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच प्रवेश झालाय. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं सरचिटणीस पद त्यांना बहाल करण्यात आलं. यामुळे लांडे आणि हितचिंतक चांगलेच हुरळून गेले. मग या नियुक्तींचा आनंद साजरा करताना अभिनंदनाचे फ्लेक्स जुन्नर तालुक्यात झळकवण्याचं ठरलं. त्यानुसार प्रत्येक परिसरात फ्लेक्स लावताना त्या भागातील हितचिंतकांना फ्लेक्सवर जागा देण्यात आली. यातील काही फ्लेक्स हितचिंतकांनी स्वखर्चातून ही लावले. पण या सर्व हितचिंतकांना एकाच फ्लेक्सवर जागा देण्याचं ठरलं. या सर्वांची यादी आणि त्यांचे फोटो एकत्रित करण्यात आले. त्याची संख्या ही साडे हजारांच्या घरात जाऊन पोहचली.
जुन्नरच्या एस टी स्टँड समोर झळकणाऱ्या या भव्यदिव्य फ्लेक्सला घेऊन एक ही हितचिंतक नाराज होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली. त्यानुसार हा फ्लेक्स 125 फुटी रुंद तर 22 फुटी लांबीचा तयार करण्याचं ठरलं. अखेर हा फ्लेक्स तयार झाला. त्यावर अमोल लांडेचा फोटो लगेच नजरेत पडतो. मात्र अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनकेसह प्रमुख नेत्यांना फ्लेक्सवर कमी जागा मिळाली. हितचिंतकांचा चेहरा तर अगदी अस्पष्ट दिसतोय. असं असलं तरी या फ्लेक्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, राज्यभर हा फ्लेक्स चर्चेचा विषय ठरला आहे. इतका मोठा फ्लेक्स लाऊन माझ्या हितचिंतकांनी माझ्यावर असं प्रेम व्यक्त केलं. त्यामुळे माझ्या नियुक्तीची चर्चा महाराष्ट्रभर झाली. शिवाय प्रमुख नेत्यांनी फोन करून कौतुक केल्याचं लांडे सांगतात.