Pune Crime : आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण, मग अनैसर्गिक अत्याचार करून हत्या; पुण्यात पुन्हा एकदा थरकाप
सुरुवातीला अपघातात झाल्याचा बनाव नराधमाने केला होता. मात्र, पोलिस तपासात त्याचं बिंग फुटलं गेलं आहे. नराधम आरोपी पवन पांडेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये (Pune Crime) अल्पवयीन मुलाचे आधी अपहरण मग अनैसर्गिक कृत्य करून त्याची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. सुरुवातीला अपघातात झाल्याचा बनाव नराधमाने केला होता. मात्र, पोलिस तपासात त्याचं बिंग फुटलं गेलं आहे. नराधम आरोपी पवन पांडेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
रात्रीच्या काळोखात मुलावर अनैसर्गिक अत्याचार
नराधमाने वाकड हद्दीतून आठ वर्षीय मुलाचे शनिवारी रात्री अपहरण केले. नराधम पांडे हा रसवंतीगृहात तीन दिवसांपूर्वी कामाला आला होता. त्याठिकाणी पीडित खेळत असायची. हे पाहून नराधमाने त्याला एकदा ऊसाचे रस दिला. असं करून मुलाशी जवळीक साधली आणि शनिवारच्या रात्री साडे आठच्या सुमारास त्याचं अपहरण केलं. तिथून पाषाण तलावालगत घेऊन गेला. रात्रीच्या काळोखात त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली. तोपर्यंत पीडित मुलाच्या कुटुंबियांकडून त्याची शोधाशोध सुरू झाली.
अखेर रात्री दहा वाजता पीडिताच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले, दुसरीकडे रात्री अकराच्या सुमारास रसवंती गृहाच्या मालकाने पांडेला फोन करून गायब मुलाला पाहिलं होतं का? अशी विचारणा केली. मात्र, मला त्याबाबत कल्पना नसल्याचं तो म्हणाला, पण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले, त्यात पांडे मुलाला खुणावत असल्याचं अन् मुलगा त्याच्या पाठीमागे चालत निघाल्याचं अन पुढं जाऊन दोघे अचानकपणे गायब झाल्याचं दिसून आलं.
पोलिसी खाक्या दाखवताच बोलू लागला
त्यामुळं सकाळी वाकड पोलिसांनी बावधन गाठलं आणि पांडे राहत असलेल्या घरात जाऊन त्याला ताब्यात घेतलं. सुरुवातीचे तीन तास त्याने तोंडचं उघडले नाही, मग पोलिसी खाक्या दाखवताच तो बोलू लागला. माझ्याकडून अपघात झाला अन त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार, म्हणून मी मृतदेह पाषाणमध्ये फेकल्याचे स्पष्टीकरण त्याने दिलं. मग पोलिसांनी त्याने विश्वासात घेतलं अन घटनास्थळ गाठलं.
तेव्हा पांडेने अपघाताचा बनाव रचल्याचं स्पष्ट झालं. या नराधमाने निष्पाप मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचं उघड झालं. वाकड पोलिसांच्या तपासात पांडेचं बिंग फुटले, पण या दुर्दैवी घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या