तुमच्या जेवणात बनावट पनीर तर नाही? पुण्यात बनावट पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश, 900 किलोंचा साठा जप्त
Pune News : पुण्यात मांजरीमध्ये अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. बनावट पनीर कारखान्यांवर छापा टाकून 899 किलो बनावट पनीर साठा जप्त करण्यात आला आहे.
Pune News : सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर (Coronavirus) तब्बल दोन वर्षांनी यंदा गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2022) उत्साह काही औरच आहे. अशातच मिठाई, अन्नधान्यांच्या दुकानात खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. पण या सणासुदीच्या काळात अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ ग्राहकांना विकले जातात. याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झालं आहे. त्यांनी पुण्यातील (Pune) बनावट पनीर (Paneer) कारखान्यांवर छापा टाकून सर्व साठा जप्त केला आहे.
पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील मांजरीमध्ये अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. बनावट पनीर कारखान्यांवर छापा टाकून 899 किलो बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. याच काळात मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळेच अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झालं आहे. पुण्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द इथल्या मे. आर. एस डेअरी या बनावट पनीर कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन छापा मारला आहे. यावेळी तब्बल 2 लाखांचा 899 किलोंचा बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. बनावट पनीर बनवण्यासाठी लागणारं लाखोंचं साहित्यही यावेळी जप्त करण्यात आलं आहे. सण उत्सव काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी अन्न औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुण्यातील मांजरी येथे असलेल्या या कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपयांचं 899 किलो बनावट पनीर जप्त केलं आहे. तसेच, बनावट पनीर तयार करण्यासाठी वापरली जाणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किमतीची 549 स्किम्ड मिल्क पावडर आणि तब्बल 4 लाखांचा इतर ऐवज जप्त केला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्यानं जप्त केलेला साठा अन्न आणि औषध प्रशासनाकडून जागेवरच नष्ट करण्यात येणार आहे. तसेच, या साठ्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, सणासुदीच्या काळात ग्राहकांना फसवून बनावट आणि भेसळयुक्त पदार्थ ग्राहकांना विकले जातात. असा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ अन्न आणि औषध प्रशासनाला त्याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केलं आहे. तसेच, त्यासाठी एक टोलफ्री क्रमांकही जारी केला आहे. बनावट आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचं आढळून आल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्यात यावी, असं आवाहन केलं आहे. तसेच, तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आलं आहे.