एक्स्प्लोर
कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा संबंध नाही : पोलीस
दोन महिन्यांच्या तपासानंतर कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारात एल्गार परिषदेचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद यांचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी म्हटलं आहे. दोन महिन्यांच्या तपासानंतर कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारात एल्गार परिषदेचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. मात्र एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांचा संबंध होता आणि माओवाद्यांनी त्यासाठी पैसा पुरवला, असा दावा रवींद्र कदम यांनी केला. एल्गार परिषदेला जरी माओवाद्यांनी पैसा पुरवला असला तरी या परिषदेत सहभागी झालेले सर्वजणच माओवाद्यांशी संबंधित होते असं म्हणता येणार नाही, असंही रवींद्र कदम यांनी स्पष्ट केलं. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात रवींद्र कदम बोलत होते. कोरेगाव-भीमामध्ये काय घडलं होतं? कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 1 जानेवारीला विजय दिवस साजरा करण्यात आला. कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. कुणावर गुन्हे दाखल झाले? या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. दुसरीकडे, एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये कबीर कला मंचचा समावेश करण्यात आला. कबीर कला मंचाने एल्गार परिषदेत सादर केलेल्या गीतांतून लोकांना चेतवल्याचा गुन्हा पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर























