मोठी बातमी: मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींचं घबाड हाती लागलं
मंगलदास बांदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणुकीवेळी सुनेत्रा पवार यांचा बांदल यांनी प्रचार केला होता.
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांची मालमत्ता ईडीने जप्त केलीय. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर इथली 85 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केलीय. कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप मंगलदास बांदल यांच्यावर आहे. याआधी याच गुन्ह्यात अनिल भोसलेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
मंगलदास बांदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणुकीवेळी सुनेत्रा पवार यांचा बांदल यांनी प्रचार केला होता. बांदल यांची पुणे,सोलापूर,अहमदनगर जिल्ह्यात असलेली मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती. मनी लॉड्रिंग प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने 21 ऑगस्ट रोजी छापे टाकले होते. त्यावेळी बांदल याना अटक केली होती.
सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई
ईडीकडून बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली. बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मंगलदास बांदल यांनी कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप
मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांची यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अनिल भोसले यांच्याविरोधात दाखल होता गुन्हा त्याच गुन्ह्यात ईडीची कारवाई करण्यात आली आहे. मंगलदास बांदल यांनी कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनिल भोसले यांच्याविरोधात यापूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
कोण आहेत मंगलदास बांदल?
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या नावांच्या वारंवार चर्चा केल्या जातात. पैलवान म्हणूनही त्यांची ओळख आहे. मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. 50 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांना 2020 मध्ये निलंबित करण्यात आले होते. शिरूर हवेलीच्या राजकारणातील एक महत्वाचा राजकीय चेहरा म्हणून बांदल (Mangaldas Bandal) यांची ओळख आहे. त्यांच्यावर वारंवार पक्षबदलाचे आरोप देखील केले जातात. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर-हवेलीमधून तयारी करीत असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर बांदल यांच्यावर 'ईडी'ची छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.