RTE Amendments 2024 : पाचवी आणि आठवीमधल्या ढकलगाडीला लागणार ब्रेक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : पाचवी आणि आठवीतल्या ढकलगाडीला यापुढे ब्रेक लागणार असून केंद्र सरकारनं या वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आरटीई कायद्यात बदल करण्यात आले आहेत. पाचवी आणि आठवीत नापास झाल्यानंतर फेरपरीक्षा घेण्यासंदर्भात धोरण आखण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहे. त्यामध्येही जर विद्यार्थी नापास झाला तर त्याला त्याच वर्गात बसावं लागणार आहे. दरम्यान, अपयशी विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये याची योग्य ती काळजी घेतली जाईल असंही शिक्षण विभागानं स्पष्ट केलं.
या आधी पाचवी ते आठवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नापास करू नये असा नियम करण्यात आला होता. त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्याची परीक्षेत पास होण्याइतपत गुण नसतील तर त्याला नापास करता येणार आहे. पण अशा विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात आली आहे.
दोन महिन्यात परीक्षेची पुन्हा संधी
पाचवी आणि आठवीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या दोन महिन्यात फेरपरीक्षा देता येणार आहे. त्या परीक्षेतही नापास झाल्यास त्यांना त्याच वर्गात बसावं लागणार आहे. आरटीई कायदानुसार, कोणत्याही मुलाची इयत्ता 8 वी पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकले जाणार नाही.