Pune Ganeshotsav 2022: येरवडा कारागृहातील कैद्यांनी साकारल्या गणेशमूर्ती; मूर्ती बनवण्याचं पहिलंच वर्ष
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी गणेशाच्या सुंदर आणि पर्यावरणपूरक मूर्ती कोरल्या असून त्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने लोक आकर्षित झाले आहेत.
Pune Ganeshotsav 2022: पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी गणेशाच्या सुंदर आणि पर्यावरणपूरक मूर्ती कोरल्या असून त्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने लोक आकर्षित झाले आहेत. या सगळ्या मुर्त्या कोरीव आणि रेखीव आहेत त्यामुळे या मुर्त्या खरेदी करण्यासाठी पुणेकर गर्दी करत आहेत. या कारागृहातील कैद्यांनी या मूर्ती बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे तुरुंग उद्योगातील किरकोळ दुकानांवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. जेथे कैद्यांनी बनवलेले लाकडी फर्निचर, कार्पेट्स, चप्पल, कलाकृती इत्यादींची विक्री केली जाते.
नाशिक मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून दरवर्षी गणेशमूर्ती बनवल्या जातात. येरवडा मध्यवर्ती कारागृहात पहिल्यांदाच अशी सुरुवात करण्यात आली असून नाशिक कारागृहातील दोन कैदी कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांनी येरवड्यातील 15 कैद्यांना शिल्पकलेचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी देखील उत्साहाने या उपक्रमात चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि सुबक मुर्त्या तयार केल्या, असं येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितलं.
दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पर्यावरणाचा विचार करून या मूर्ती शाडू किंवा मातीच्या बनवल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. कारागृहाचे किरकोळ दुकान गेल्या अनेक वर्षांपासून सेवेत आहे. कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंना चांगली मागणी आहे. लोक सहसा दुकानातून अनेक वस्तू खरेदी करतात. त्यामुळे आम्ही यंदा मूर्ती बनवण्याचा विचार केला. मात्र कमी वेळात ही कला कैद्यांनी आत्मसात करून गणेशाच्या 250 हून अधिक सुंदर मूर्ती तयार केल्याचा मला आनंद आहे, असंही त्यां सांगतात.
मूर्ती बनवण्याची ही पहिलीच वेळ
येरवडा कारागृहात अनेक वस्तू बनवल्या जातात. त्यात वेगवेगळ्या वस्तुंचा समावेश असतो. या वस्तु विकण्यासाठी येरवडा भागात त्यांचं विशेष केंंद्र देखील आहे. मात्र या कारागृहात आतापर्यंत गणेश मुर्ती साकारण्यात आल्या नव्हत्या. या वर्षी या मूर्ती साकारण्याचा निर्णय घेतला. कैद्यांना मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यानंतर कैद्यांनी या मूर्ती साकारल्या आहेत. या मुर्ती सगळ्यांच्या पसंतीस आल्या आहेत.
पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद
कोरोनानंतर दोन वर्षांनी मोठ्या जल्लोषात पुण्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे. दोन वर्षांनी होणाऱ्या या गणेशोत्सवासाठी येरवडा कारागृहातील कैदी देखील उत्साही दिसत आहे. त्यांनी कमी वेळात या मूर्ती साकारून त्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत तर काही मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरु आहे. यासाठी पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.