Dress Code For Mandir : नागपूरनंतर पुण्यातील 'या' मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी; ग्रामस्थांकडून निर्णयाचं स्वागत
पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे.
Temple Dress Code : महाराष्ट्रातील मंदिरांत जाणाऱ्या भाविकांच्या वेशभूषेवरून सध्या अनेक वाद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या फलकावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर नागपुरातील महाराष्ट्र मंदिर महासंघाने चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता पुण्यातील मंदिरातदेखील शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
वाघेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मात्र शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पावित्र्य भंग पावत आहे. अन्य भविकांचीही तशी ट्रस्टकडे तक्रार आहे. मंदिराचे पावित्र्य राखले जावे, यासाठी वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सातव आणि उपाध्यक्ष दाभाडे यांनी हा निर्णय घेतला आहे, सूचना देणारे फलक मंदिरात लावण्यात आले आहेत. पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. या निर्णयाचे स्वागत वाघोलीतील नागरिकांनी आणि भाविकांनी केले.
मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाही. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम लागू करण्यात आले आहेत.
मंदिर प्रशासनाच्या निर्णयाचं गावकऱ्यांकडून स्वागत
हिंदू मंदिरातील संस्कृती जपावी आणि कोणीही मंदिरात तोकडे कपडे घालून प्रवेश करु नये, असा फलक मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. पुणे शहरात अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. त्यात अनेक पर्यटक तोकडे कपडे परिधान करुन असतात. मंदिरात असे अशोभनीय कपडे घालू नये, असा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. वाघोलीतील हे प्रचंड जुनं मंदिर आहे. मंदिर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचं गावकऱ्यांनी स्वागत केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांनी व्यवस्थित आणि शोभनीय कपडे परिधान करुन यावे, अशी विनंती गावकऱ्यांनी भाविकांना केली आहे. सध्या पुण्यातील एकाच मंदिरात हा नियम लागू करण्यात आला आहे. मात्र पुण्यात असे अनेक पुरातन मंदिरं आहेत. त्या मंदिरातदेखील हा नियम लागू होणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.