Dilip Walse Patil : माझ्या अनुभवाएवढं त्यांचं वय नाही! रोहित पवारांमुळं साहेबांची साथ सोडली; दिलीप वळसे पाटलांची टीका
Dilip Walse Patil : आपण कोणीही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आणि त्याद्वारेच आपलं काम करणार आहोत, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
Dilip Walse Patil : अजित पवारांची (Ajit Pawar) साथ देत सत्तेत सामील झालेले राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या अनुभवाएवढं त्यांचं वय नाही, रोहित पवारांमुळं साहेबांची साथ सोडली, असं म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, ''त्यांचं वय (रोहित पवार) 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं.''
''मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात जाऊ शकत नाही''
दिलीप वळसे-पाटील पुढे म्हणाले की, ''माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल, तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे राहा. माझं कोणतंही भांडण नाही. मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही'', अशी प्रतिक्रिया फुटीर अजित पवार गटातील नेते कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. हा निर्णय घेतला असला तरी आपण कोणीही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच आपण आपलं काम करणार आहोत, असेही ते म्हणाले.
रोहित पवार पाणी पळवत आहेत
आमदार रोहित पवार यांच्यावर वळसे पाटील यांनी पाणी पळवत असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, माझ्यासमोर मोठा पेच होता. मधल्या काळात एक घटना घडली. पाटबंधारे विभागाकडे एक प्रस्ताव आला. डिंभे धरणाचे पाणी बोगदा करून पलीकडे नेण्याचा प्रस्ताव होता. पाणी आपली वैयक्तिक मालमत्ता नाही. मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, तेव्हा पाण्यावरून वाद होऊ दिला नाही. मग मी पवार साहेबांकडे गेलो, दोन तीन बैठकाही झाल्या. पण 712 मीटर बोगद्यावर घ्यायचं ठरलं. मात्र, या सरकारने निर्णय घेतला की, बोगदा एकदम धरणाच्या तळाला घ्यायचा. देवेंद्र फडणवीस यांनी तसा प्रस्तावही पाठवला आहे. डिंभेचा बोगदा जेव्हा व्हायचा तेव्हा होईल, असं ही वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.
वळसे-पाटील पुढे सांगितलं की, आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यात जे 65 बंधारे बांधले आहेत. ते पावसाने भरेल तितकंच पाणी मिळेल, धरणातून पाणी मिळणार नाही, असं सरकारनं म्हटलं आहे. या परिसरात पाच साखर कारखाने आहेत, मग उसाला पाणी मिळालं नाही आणि ऊस पिकला नाही, तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडून जाईल, म्हणून आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मी काय हयातभर आमदार राहणार नाही. मात्र, अशी परिस्थिती झाली तर आपला परिसर दुष्काळी झाल्याशिवाय राहणार नाही. हे मनाला खटकत होतं. एका बाजूला तालुक्याचा प्रश्न आणि दुसरीकडे पवार साहेबांचे प्रेम असा पेच निर्माण झाला. काही लोक म्हणतील की, सत्तेच्या बाहेर राहून ही झालं असतं, मात्र अशा कामांना सत्तेत राहणं गरजेचं असतं. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असं स्पष्टीकरण वळसे-पाटील यांनी दिलं आहे.
आपली लढाई साहेबांशी नाही
दिलीप-वळसे पाटील यांनी सांगितलं की, "आपली लढाई साहेबांशी नाही. मी तर उलट सांगेन, आपल्या आंबेगावमध्ये जेव्हा सभा होईल तेव्हा तुम्ही सगळे त्या सभेला आवर्जून जा. उद्याच्या निवडणुकीत काय होईल, याची मी चिंता करत नाही. ईडीमुळे मी साहेबांची साथ सोडली नाही. मी जाहीर करतो मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आलेली नाही. यामागे वैयक्तिक हित नाही."
ते पुढे म्हणाले की, "एका विद्वानाने सांगितलं की पराग आणि गोवर्धन डेअरीला नोटीस आली म्हणून हे केलं. माझा आणि या डेअरीचा काडीचाही संबंध नाही. आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचा या डेअरीसोबत एक रुपयांचा संबंध नाही. देवेंद्र शहा यांच्यासोबत 1988 साली माझी आणि त्यांची ओळख झाली. रामकृष्ण मोरे आले तेव्हा मैत्री झाली. शरद बँकेच्या प्रमोटरमध्ये देवेंद्र शाह यांचे वडील होते."
उद्धव ठाकरेंना सहा महिन्यांपासून आम्ही सांगत होतो
वळसे पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड साहेब बरेच सुटलेले आहेत. एकनाथ शिंदे जेव्हा आमदार घेऊन गेले, तेव्हा दिलीप वळसे यांनी गृहमंत्री म्हणून मदत केली. आता साधा प्रश्न आहे की, एकनाथ शिंदे गेल्यावर माझंही पद जाणार आहे, मीही सत्तेबाहेर असणार. उलट उद्धव ठाकरेंना सहा महिन्यांपासून आम्ही सांगत होतो, तुमचे आमदार फुटणार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना कळवलं होतं. मग मी मदत करण्याचा प्रश्न येतो कुठं? असा सवाल त्यांनी केला.