Dattatray Ware : वारे गुरुजी जिंकले! अखेर दत्तात्रय वारे दोषमुक्त; आरोपांमधे तथ्य नसल्याचा निष्कर्ष समोर
पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करुन ही शाळा विख्यात करणाऱ्या दत्तात्रय वारे गुरुजींवर गावातील राजकारणातून दोन वर्षापूर्वी गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले.
पुणे : पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करुन शाळा विख्यात करणारे दत्तात्रय वारे गुरुजी अखेर दोषमुक्त झाले आहेत. पुणे जिल्हा परिषदेकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा वारे गुरजींवरील आरोपांमधे कोणतंही तथ्य नसल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. गावातील राजकारणातून दोन वर्षापूर्वी गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेकडून त्यांच निलंबन करण्यात आलं. काही महिन्यांनी हे निलंबन मागे घेण्यात आलं आणि वारे गुरुजींची आंबेगाव तालुक्यातील जालिंदर वाडी या आदिवासीबहुल भागातील शाळेवर बदली करण्यात आली.
वारे गुरुजींनी या शाळेचाही कायापालट करून दाखवला, पण वाबळेवाडीतील शाळेत गैरव्यवहार केल्याचा आरोपाची चौकशी सुरुच होती. अखेर या चौकशी समितीने वारे गुरुजींवरील आरोपात कोणतही त्यातल्याच निष्कर्ष काढत तसा अहवाल सादर केला आहे.
नेमका कोणता आरोप होता?
शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांचा समावेश असलेली शाळा विकास समिती वाबळेवाडीत काम करत होती. शाळेसाठी ही समिती ऐच्छिक स्वरुपात देण्यात येणाऱ्या देणग्या स्वीकारत होती. देणग्या स्वीकारताना त्याचा व्यवस्थित हिशोब ठेवला नसल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दत्तात्रय वारे यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
स्थानिक राजकारणामुळे दत्तात्रय वारे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. दत्तात्रय वारे सकाळपासून रात्रीपर्यंत शाळेत थांबत होते. पण कामात अनियमितता असा आरोप ठेवून त्यांचं निलंबित केल्याचं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं. गावकऱ्यांनी लाखो रुपये जमा केले, काही कंपन्यांकडून निधी मिळवला, त्याचा हिशोब गावकऱ्यांनी ठेवला. मुख्याध्यापकांचा काहीच संबंध नाही. परंतु, ओढून-ताणून त्यांना या आर्थिक व्यवहारात जबाबदार धरून निलंबित केल्याचं काही स्थानिकांनी म्हटलं होतं.
वारे गुरुजींनी पुन्हा करुन दाखवलं
हे सगळं झाल्यानंतर त्यांचं निलंबन रद्द करुन त्यांची नियुक्ती आंबेगाव तालुक्यातील जालिंदर वाडी या गावातील शाळेत केली. त्यांनी या शाळेचाही कायापालट केला. आता त्या शाळेतील मुलं हसत खेळत शिकताना दिसत आहे. सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून सातत्याने बोलत असते. अशा वेळी जिल्हा परिषदेची शाळा किती प्रभावी होऊ शकते? खासगी शाळेलाही मागे टाकत आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण करू शकते, याचं ही शाळा उत्तम उदाहरण आहे.
इतर महत्वाची बातमी-