(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पहिल्या पावसानं निसर्ग बहरला; निर्बंध असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
सूर्याचा दाह झेलून रखरखीत झालेले डोंगरमाथे पुन्हा बहरले आणि अनेक घाटमाथे वाटसरुंचं लक्ष वेधू लागले
लोणावळा : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळं सर्वत्र निसर्गाची विविध रुपं पाहायला मिळत आहे. सूर्याचा दाह झेलून रखरखीत झालेले डोंगरमाथे पुन्हा बहरले आणि अनेक घाटमाथे वाटसरुंचं लक्ष वेधू लागले. महाराष्ट्रात कोरोना नियमांच्या धर्तीवर लागू करण्यात आलेले निर्बंध प्रशासनानं टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्याचा निर्णय घेतला आणि नागरिक जणू याच संधीची वाट पाहत होते असंच काहीसं वातावरण दिसून आलं.
पावसाचा शिडकावा झाल्यानंतर लगेचच सुट्टीचं निमित्त साधत शनिवार आणि रविवारी लोणावळा, नवी मुंबईतील पारसिक हिल भागात अनेक जवळपासच्या पर्यटकांनी गर्दी केली. मुंबईकरांच्या वाटाही लोणावळ्याच्या दिशेनं आणि पुण्यानजीक असणाऱ्या डोंगरमाथ्यांच्या दिशेनं वळल्या.
इथं असणाऱ्या लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट वर अनेक पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. पोलीस बंदोबस्त असूनही इथं नागरिकांची गर्दी पाहायला मिळत असून, लोणावळ्याच्या रत्यांवर वाहतूक कोंडीही दिसत आहेय. शासन नियमांनुसार पर्यटन स्थळं बंद असूनही नागरिकांनी मात्र विविध मार्ग शोधत, चक्क भिंतीवरुन उड्या मारुन या भागांत एंट्री केली आहे. त्यामुळं आपण कोरोनाचा किती गांभीर्यानं विचार करतो हाच प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.
कोरोना अद्यापही गेलेला नाही, आणखी काही वेळासाठी निर्बंधांचं काटेकोरपणे पालन केल्यास या संसर्गाला नमवणं आणखी सोपं होईल. पण, अशाच पद्धतीनं नियमांचं उल्लघन झाल्यास मात्र धोका अधिक वाढेल.
लोणावळ्यातील लघु व्यावसायिकांचं शासनाला साकडं
लोणावळा आणि आजुबाजूच्या परिसकारत असणाऱ्या गावांमधील अनेकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर चालतो. पण, कोरोना नियमांमुळं त्यांच्या पोटाची खळगी भरायची कशी हा प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित आहे. त्यामुळं शासनानं आता सशर्त पर्यटन स्थळं 15 तारखेपासून सुरु करावीत आणि लघु व्यावसायिकांचा विचार करावा, या परिस्थितीत पोलिसांचं सहकार्य खूप आहे आता शासनानं सहकार्य करावं अशी अपेक्षा येथील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.