(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune koyta gang :सोशल मीडियावर कोयता घेऊन स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल; तीन अल्पवयीन मुलांचा समावेश
सोशल मीडियावर कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात महत्वाचं म्हणजे या नऊ जणांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
Pune koyta gang : पुण्यात कोयता गॅंगची (koyta Gang) दहशत वाढत आहे. त्यामुळे (Pune Police News) पुणे पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात महत्वाचं म्हणजे या नऊ जणांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
तेजस संजय बधे (वय 19), उदय सिद्धार्थ कांबळे (वय 19), प्रसाद उर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय 19, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय 20, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय 28, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय 43, रा. वानवडी, पुणे), तसेच तीन अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेतले.
पोलीस हाय अलर्टवर
मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. त्यांच्यामुळे अनेक सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान देखील केलं आहे. या गॅंगला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरीदेखील अनेक परिसरातून रोज कोयता गॅंगच्या दहशतीच्या घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर काही टोळकी स्टेट्स ठेवतात, या स्टेट्समुळे अनेक स्वरुपाचे गुन्हे घडतात. त्याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्यांवर रेखी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत आहे.
कोयता गॅंगचे म्होरके ताब्यात मात्र...
कोयता गँगच्या तरुणांची हलगी वाजवत धिंड काढण्यात आली होती. कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्यांची रस्त्यावर पोलिसांनी वरात काढली होती. त्यांची ही धिंड पाहून अनेक व्यापाऱ्यांना आनंद झाला होता. कोयता गॅंगविरोधात पुण्यात कॉंम्बिंग ऑपरेशन राबण्यात येत आहे. रोज अनेक परिसरात पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत आहेत. आतापर्यंत पुणे पोलिसांनी 700 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली त्यातील अनेक आरोपींना अटक केली. कोयता गॅंगचा म्होरक्या असलेला बिट्ट्या कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अटक केली आहे. मात्र अजूनही कोयता गॅंगमधील अनेक गुन्हेगार पुण्याच्या रस्त्यांवर दहशत निर्माण करताना दिसत आहे. त्यांच्यावर योग्या कारवाई करुन त्यांना जेरबंद करणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.