(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine | पुण्यात 'स्पुतनिक 5' लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात; 17 स्वयंसेवकांना दिला डोस
Corona Vaccine : कोरोनाविरुद्धची लढाई आता सध्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. हा टप्पा म्हणजे, कोरोनावरील लस. सध्या देशात फायझर आणि सीरम या दोन कंपन्यांनी लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. अशातच पुण्यात रशियाच्या 'स्पुतनिक 5' या कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे.
Corona Vaccine | भारतात रशियाच्या 'स्पुतनिक 5' या कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील नोबेल रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 17 स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. या सर्व स्वयंसेवकांचं वय हे 18 वर्षांखाली आहे. तसेच या सर्व स्वयंसेवकांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. यासर्व स्वयंसेवकांवर या लसीचा कसा परिणाम होतो, याचं निरिक्षण करण्यात येणार आहे.
रशियात 'Sputnik V'च्या लसीकरणाला सुरुवात
रशियाने सर्वात आधी कोरोनावरील प्रभावी लस 'Sputnik V' तयार केल्याचा दावा केला होता. आता रशियाने लसीकरणालाही सुरुवात केली आहे. कोरोना लसीच्या लसीकरणात रशियाने आघाडी घेतली आहे. रशियामध्ये प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 'Sputnik V' या रशिया निर्मीत कोरोना लसीचा डोस रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये देण्यात येत आहे. डॉक्टर, आरोग्यसेवक अशा हायरिस्क वर्गात मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जात आहे. लसीकरणासाठी मॉस्कोमध्ये शनिवारी 70 लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
'Sputnik V' लसीचा प्रयोग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियामध्ये लसीकरण करताना ज्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. अशा लोकांना प्राधान्य दिलं जात आहे. Sputnik V लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, ही लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. तसेच या लसीचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत.
दरम्यान, सकारात्मक परिणामांनंतरही लसीचं सामूहिक परीक्षण अद्याप सुरु आहे. हजारो लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. मॉस्कोचे मेयर संगेई सोबयानिन म्हणाले की, ही लस सर्वात आधी शाळेतील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आमि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात येईल. सर्व रुग्णांना 21 दिवसांच्या अंतराने लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत.
कोरोना लसीकरणावरुन प्रमुख कंपन्यांमध्ये शर्यत
कोरोना लसीकरणावरुन प्रमुख कंपन्यांमध्ये शर्यत सुरु झाली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अमेरिकी औषध कंपनी फायझरने भारतात लसीकरणासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्यानंतर आता पुण्यातील सीरम इन्स्टिट्युनेही भारतात लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. दरम्यान, कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी सीरम ही देशातील पहिली कंपनी आहे. अशातच रशियाच्या 'स्पुतनिक व्ही' लसीचा डोस पुण्यातील 17 स्वयंसेवकांना देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Corona Vaccine | रशियात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात; डॉक्टर आणि आरोग्यसेवकांना लसीचा पहिला डोस
- Corona Vaccine | कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्या; सीरम इन्स्टिट्यूटची केंद्र सरकारकडे मागणी
- Corona Vaccine | भारतात लसीकरणासाठी Pfizer ची केंद्र सरकारला विनंती; तर ब्रिटनमध्ये फायझरच्या लसीला परवानगी