(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Update | आजही का होतोय पुण्यात ऑक्सिजनचा अधिक वापर
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कोरोनाचे उपचार करणाऱ्या रुग्णालयातील ऑक्सिजन वापरा संदर्भातील दैनंदिन तपशील जाहीर करत असते. त्याप्रमाणे राज्यात 1 हजार 84 रुग्णालये आहे, जी कोरोना बाधित रुग्णांना उपचार देत आहे आणि उपचारकरिता ऑक्सिजनचा वापर करत आहेत.
>> संतोष आंधळे
राज्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असली तरी पुणे जिल्ह्यात आजही सर्वाधिक कोरोनाच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा वापर अधिक होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते सध्याच्या घडीला संपूर्ण राज्यात पुणे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांचा कोरोना रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर अधिक आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात ऑक्सिजनचा मेट्रिक टन वापर हा दोन आकडी असला तरी पुणे जिल्हा या परिस्थितीला अपवाद असून तेथे आजही मेट्रिक टन तीन आकडी आहे. अर्थात आधीच्या तुलनेने तो कमी असला तरी राज्यात अधिक कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनचा वापर करण्यात पुणे अग्रेसर असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कोरोनाचे उपचार करणाऱ्या रुग्णालयातील ऑक्सिजन वापरा संदर्भातील दैनंदिन तपशील जाहीर करत असते. त्याप्रमाणे राज्यात 1 हजार 84 रुग्णालये आहे, जी कोरोना बाधित रुग्णांना उपचार देत आहे आणि उपचारकरिता ऑक्सिजनचा वापर करत आहेत. त्यानुसार सोमवारी 492.448 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन दिवसभरात वापरला गेला. त्यासाठी 509.413 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन उत्पादकाकडून प्राप्त झाला आहे. यानुसार मागणी पेक्षा सध्याच्या घडीला तरी पुरवठा चांगला आहे. सध्या 1589.209 मेट्रिक टन स्टॉक शिल्लक आहे.
सध्या संपूर्ण राज्यात 1 लाख 18 हजार 777 ऍक्टिव्ह रुग्ण असून ते विविध भागात उपचार घेत आहे. त्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात असून ते 24 हजार 693 इतके आहे. तर त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 17 हजार 982, ठाणे जिल्ह्यात 17 हजार 317, नाशिक जिल्ह्यात 6 हजार 58 तर नागपूर जिल्ह्यात 4 हजार 507 रुग्ण आहेत. त्यापद्धतीने कोरोना बाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा वापरही होत असून सर्वात अधिक वापर पुणे जिल्ह्यात 114.520 मेट्रिक टन, मुंबई शहरात 96.515 मेट्रिक टन, ठाणे/पालघर जिल्ह्यात 46.85 मेट्रिक टन, नाशिक जिल्ह्यात 26.410 मेट्रिक टन तर नागपूर जिल्ह्यात 38 मेट्रिक टन वापर होत आहे.
ज्यावेळी राज्यात रुग्णांसाठी ऑक्सिजनची होती त्यावेळी राज्य शासनाने साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80 टक्के व उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील. यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60 टक्के आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50 टक्के या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा. हे केल्यानंतर लक्षात आले प्राणवायची ज्या वाहनाने वाहतूक करतात त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणींना सामना करावा लागतो. परिणामी प्राणवायू वेळेवर रुग्णालयांना पोहचत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी प्राणवायूची वाहतूक करणाया वाहनांना शासनातर्फे रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या वाहनाची वाहतूक कोंडीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही म्हणून या वाहनांवर सायरन आणि रुग्णवाहिकेला वापरत येणारी बत्ती लावण्यास अनुमतीही दिली आहे.
कोरोनाबाधित बहुतांश रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज लागते. कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम माणसाच्या श्वसन संस्थेवर हल्लाबोल करतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता मंदावते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांना कोरोनाबाधित रुग्णांच्या फुफ्फुसांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. कोरोनाच्या आजारात ज्या रुग्णाला फुफ्फुसाच्या व्याधीची अडचण दूर होते तो रुग्ण अर्ध्यापेक्षा जास्त बरा झालेला असतो. वैद्यकीय तज्ञांसाठी रुग्णाच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याकडे सर्वात जास्त लक्ष असते.
21 सप्टेंबरला, "प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!" या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या महत्तवपूर्ण औषधाची टंचाईची, बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीची जागा काही दिवसांपासून या आजाराच्या उपचारात योगदान ठरणाऱ्या प्राणवायूने घेतली आहे. कुठल्याही वैद्यकीय तज्ञाने स्वप्नातही विचार केला नसेल की राज्यात रुग्णाच्या उपचारात वापरात येणाऱ्या प्राणवायूची टंचाई भासून त्यावर संपूर्ण राज्यात यावरून ओरड होऊ शकते. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांपासून ते अन्न औषध प्रशासन मंत्री सध्या या प्राणवायूचा पुरवठा सर्व रुग्णालयातील राज्यात व्यवस्थित व्हावा म्हणून युद्धपातळीवर काम करीत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने 'प्राणवायूचा' वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आणि त्यातूनच सुरु झाल्या त्या प्राणवायू उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी, गेल्या काही दिवसाचा जर अन्न औषध प्रशासन विभागाचा कोरोनाच्या अनुषंगाने वापरण्यात येणाऱ्या दैनंदिन प्राणवायूचा अहवाल पहिला तर सर्वात जास्त पुणे विभागात प्राणवायूचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्या खालोखाल नाशिकात प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. दीड महिन्यापूर्वी कोरोनाचा 'हॉटस्पॉट' असणाऱ्या मुंबई विभागाला ऑक्सिजन वापराच्या बाबतीत मात्र पुणे आणि नाशिक विभागाने मागे टाकले आहे. या दोन विभागाचा प्राणवायूचा वापर संपूर्ण राज्यात एकूण वापरण्यात येणाऱ्या प्राणवायू वापरच्या 50 टक्क्यापेक्षा अधिक आहे.
20 सप्टेंबर रोजी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कोरोना रुग्णालयात प्राणवायूचा राज्यात होणार वापर आणि सध्याचा साठा यावर जो अहवाल सादर केला होता. त्यानुसार, एका दिवसात संपूर्ण राज्यात 771.347 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर रुग्णांकरिता करण्यात आला आहे आणि 796.729 मेट्रिक टन प्राणवायू पुरवण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वात अधिक वापर हा पुणे विभागात करण्यात आला असून तो 347.3 मेट्रिक टन इतका आहे. या विभागात इतका वापर का होतोय त्याची कारणे फार सोपी आहेत. पुणे विभागात मुख्यत्वे करून पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या मोठ्या जिल्ह्याचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. या पूर्ण विभागात 436 कोरोनाचा उपचार करणारी स्वतंत्र रुग्णालये असून राज्यात सर्वात जास्त रुग्णालय असणार हा विभाग आहे. या विभागातील एकट्या पुणे जिल्ह्याला 213.530 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर एका दिवसात केला गेला आहे आणि 217 मेट्रिक टन इतका प्राणवायू पुणे जिल्ह्याला पुरवण्यात आला आहे. त्याखालोखाल नाशिक विभागात प्राणवायूचा वापर करण्यात आला असून तो 92.60 मेट्रिक टन इतका आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात एकूण 274 कोरोनाचे उपचार देणारे रुग्णालय असून सर्वात जास्त प्रव्ययच वापर नाशिक जिल्ह्यात झाला असून तो 34. 200 मेट्रिक टन इतका आहे. त्यानंतर मुंबई विभागात 86.204 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर करण्यात आला असून मुंबई विभागात फक्त मुंबई जिल्ह्याचा समावेश असून या विभागात कोरोनावर उपचार करणारी 61 रुग्णालये आहेत.