काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना शिवीगाळ करणं भोवलं, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
काँग्रेस नगरसेवकांना उद्घाटनाला न बोलावता फक्त भाजपच्या नगरसेवकांना बोलावल्याने धंगेकर आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात वाद झाला होता.
पुणे : काँग्रेसचे (Congress) कसबा पेठचे (Kasaba) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्याविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आलाय. शुक्रवारी पुण्यातील गोखले नगर भागातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांत वाद निर्माण झाला होता. त्यावेळी काँग्रेस नगरसेवकांना उद्घाटनाला न बोलावता फक्त भाजपच्या नगरसेवकांना बोलावल्याने धंगेकर आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात वाद झाला होता.
पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे रविंद्र धंगेकरांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी धंगेकराच्या विरोधात चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंगेकरांच्या शिवीगाळ प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ उडाली.
नेमकं घडलं काय?
प्रजासत्ताक दिनानिमित्त गोखलेनगरच्या आशानगर परिसरात महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाल काँग्रेस पक्षाला जाणूनबुजून डावलल्याचा आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. काँग्रेस पक्षाला का डावलले? आत का घेतले नाही? असा जाब विचारत रविंद्र धंगेकरांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिवीगाळीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दरम्यान धंगेकरांच्या या कृतीचा महापालिकेच्या अभियंता संघाने निषेध केला
या टाकीजवळ आमदार धंगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा पोलिसांशी वाद झाला काही प्रमाणात झटापट देखील झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाला येणार का याबद्दल उत्सुकता आहे. पुण्यातील कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आतापर्यंत अनेकदा क्षेयवादाची लढाई पाहायला मिळाली आहे. भाजपची सत्ता असताना अनेक विकास कामांवर लक्ष देत कामं पूर्ण करुन घेतली, असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्या उलट या टाकीचं काम आम्ही पूर्ण केलं तरीही अजित पवार उद्घाटन का करत आहे?, असा प्रश्न उपस्थित करत आम्हीच टाकी उभारली असा दावा केला जात आहे.
भाजपचं काय म्हणणं आहे?
मार्च 2016 मध्ये या टाकीचं काम सुरु झालं होतं. त्यानंतर 2017 मध्ये लगेच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये भाजपचे नगरसेवक निवडणून आले. 2017 ते 2022 पर्यंत टाकीचं काम पूर्ण झालं. या सहा वर्षात कॉंग्रेसची सत्ता एकच वर्ष होती. तरीही कॉंग्रेस या टाकीचं काम आम्ही केल्याचा दावा करत आहे. हा दावा साफ खोटा असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. या टाकीसाठी साधारण 11 कोटी खर्च आला, असंही भाजपक़डून सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा :