Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडणार? शिवसेना पक्षप्रवेशावर केलं मोठं विधान, म्हणाले, 'जाताना लपून जाणार नाही…'
Ravindra Dhangekar: धंगेकर आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाढती जवळीक आणि तो स्टेटसचा फोटो यामुळे चर्चांना उधाण आलं आहे, त्यावरती आज माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पुणे : पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे सध्या शिवसेना शिंदेंच्या (Eknath Shinde) गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच काल (शनिवारी) त्यांनी गळ्यात भगवं उपरणं असलेलं ठेवलेलं व्हाट्सअप स्टेटस चर्चेत होतं. त्यानंतर काही तासांमध्ये शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) मुलाचा वाढदिवस साजरा केल्याची माहिती समोर आली होती. याबाबतचे फोटो उदय सामंत यांनी सोशल मिडियावरती शेअर केले होते. त्यामुळे आता धंगेकर आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाढती जवळीक आणि तो स्टेटसचा फोटो यामुळे चर्चांना उधाण आलं आहे, त्यावरती आज माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले धंगेकर?
याबाबत बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, शिवजयंतीमधील माझा फोटो आहे. जो सध्या वायरल होत आहे. तो मी चागला वाटला म्हणून स्टेटसला ठेवला, हिंदू धर्म आहे, भगवा गळ्यात ठेवणं गैर काय आहे. सगळीकडे मित्र आहेत. सगळ्या पक्षात मित्र आहेत, येणं जाणं होतं, फोटो बाहेर आल्याने चर्चा सुरू आहे. मी अजित दादांना पण भेटतो. मी काँग्रेसमध्येच आहे. धर्माचा अभिमान आहे. द्वेष करणं आपल्याला जमत नाही. माझं सगळीकडे स्वागत केलं जात आहे. चांगली लोकं सगळ्यांना आवडतात. त्यामुळे उदय सामंत यांनी स्वागत करू म्हटलं. मी सर्वांना भेटलो माझी काम होती, म्हणून एकनाथ शिंदे यांना भेटतो काम असल्याने सगळ्यांना भेटतो असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
त्याचबरोबर, मी जाताना लपून जाणार नाही, तसंच कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असंही त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "माझे मागचे स्टेटस बघा मला चांगलं वाटलं की ते स्टेटस ठेवतो. यामध्ये कधीकधी सर्वसामान्य नागरिकांचे स्टेटसपण असतात." तसंच उदय सामंतांनी (Uday Samant) ऑफर दिल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, ते मित्र आहेत. त्यांना वाटत असेल आपला मित्र जवळ पाहिजे. तसं कोणालाही वाटतं. कारण आपला स्वभाव चांगला आहे. मी लोकांशी बोलतो, लोकांसाठी काम करतो. तीस वर्ष लोकांसाठी काम करतोय लढलोय. त्यामुळे ऑफर देणं काही चुकीचं नाही. आमचे कार्यकर्तेच कालपासून धुमाकूळ घालत आहेत. फोटो व्हायरल करत आहेत. कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल तसा निर्णय होईल. मी जाताना लपून जाणार नाही आणि येताना लपून येणार नाही सर्वांशी बोलूनच मी निर्णय घेणार, असं धंगेकर यांनी सांगितलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. आज काँग्रेसमध्ये (Congress) असून मी उद्या पण तुम्हाला काँग्रेसमध्ये दिसेन. मात्र, लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घ्यायच्या आहेत. सध्या सोशल मीडियावर जे सुरू आहे त्याबाबत त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार असल्याचंही धंगेकर यावेळी बोलताना म्हणाले आहेत.





















