(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shyam Manav : श्याम मानव धमकीप्रकरणी पुण्याच्या हिंजवडीत गुन्हा दाखल; मुलानेच केली तक्रार
श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची आणि नरेंद्र दाभोळकर प्रमाणे गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आता या प्रकरणी पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shyam Manav : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (shyam manav) यांना आलेल्या धमकीप्रकरणी पुण्याच्या हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम मानव यांच्या मुलाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे
श्याम मानव यांचा मुलगा क्षितिज यामिनी शाम यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. 21 आणि 22 जानेवारीला व्हॉटसअॅपवर असे धमकीचे मेसेज आलेले आहेत. श्याम मानव यांच्या युट्युब चॅनेलच्या मॅनेजमेंटचं काम क्षितिज पाहतात, म्हणून त्यांचा मोबाईल नंबर तिथं देण्यात आलेला आहे. त्याच नंबरच्या व्हॉटसअॅपवर शिवीगाळ करत घरावर बॉम्ब फेकण्याची आणि बंदुकीतून गोळ्या घालण्याची धमकी आलेली आहे. क्षितिज पुण्यातील बावधन परिसरात राहायला आहेत आणि धमकीचे मेसेज आले तेव्हा ते घरीच होते. म्हणून हा गुन्हा पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्या अज्ञातांचा शोध घेणं सुरू आहे.
फोनवरुन केली शिवीगाळ
अज्ञात व्यक्तीने क्षितिज यांच्या फोनवर फोन करुन शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना धमकावण्याचा देखील प्रयत्न केला. जान से मार दुंगा म्हणत त्यांना मेसेज केले. त्यानंतर क्षितीज यांना काही घाणेरड्या भाषेतले मेसेज केले. त्यानंतर क्षितीज यांनी ते मेसेज थेट अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले. क्षितीज यांचे वडिल श्याम मानव यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी सांगितलं,असं तक्रारीत नमूद केलं आहे.
श्याम मानवांच्या सुरक्षेत वाढ
बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना दिव्यशक्ती दाखविण्याचे चॅलेंज देणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. त्यांना अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचे समोर आले होतं. बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र महाराजांनी नागपुरात येऊन दिव्यशक्ती असल्याचे सांगितले होते. भक्तांसमोर विविध चमत्कार दाखवल्याचा दावा केला होता. तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल सर्व माहिती चेहरा बघून सांगितल्याचा दावा केला होता. कोणाच्या घरी काय ठेवले आहे?, कुठे ठेवले आहे?, हेही सांगितले होते. त्यामुळे त्यांना नागपुरात येऊन 'दिव्यशक्ती' सिद्ध करण्याचे चॅलेंज श्याम मानव यांनी दिलं होतं. त्यावरुन वादावादी सुरु आहे.