दौंडचे आमदार राहुल कुल यांचं प्लाझ्मा दान, कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ
आमदार राहुल कूल यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य नुकतेच कोरोनामुक्त झाले असून आमदार कूल यांच्या पत्नी कांचन कूल यांनी देखील प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प केला आहे.
पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसें दिवस अधिक गडद होत आहे. सुरुवातीच्या काळात शहरी भागापुरता मर्यादित असणारा कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरत आहे. परंतू रुग्णांची संख्या आणि प्लाझ्मादाते यांच्या संख्येत प्रचंड तफावत आहे. प्लाझ्मा दात्यांचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील दौंड चे आमदार राहुल कुल यांनी आज प्रादेशिक रक्तपेढी ससून रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान केले आहे. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे राज्यातील पहिले प्लाझ्मा दान करणारे आमदार ठरले आहेत. आमदार राहुल कूल यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य नुकतेच कोरोनामुक्त झाले असून आमदार कूल यांच्या पत्नी कांचन कूल यांनी देखील प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प केला आहे.
‘कोरोना विरुद्धच्या लढाईला अधिक बळकटी मिळावी यासाठी प्रत्येक कोरोनामुक्त नागरिकाने पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे’ असे नम्र आवाहन आमदार कुल यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमधून केलं आहे. एकमेकांच्या साथीनेच आपण या संकटावर मात करू शकतो, असा आशावाद आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केलाय.
कोरोनाच्या कालावधीत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार राहुल कुल हे आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून फिल्ड वर काम करत होते. लॉकडाउनच्या काळात देखील सर्व प्रशासकीय बैठक घेऊन तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ते प्रयन्त करत होते याच काळात त्यांना देखील कोरोनाची लागण झाली. या कालावधीत संपूर्ण उपचार हे त्यांनी घरी राहूनच घेतले होते.
मागील सहा महिन्याच्या कालवधीत राज्यात अनेक मंत्री व आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर २८ दिवसांचा कालावधी उलटल्या नंतर प्लाझ्मा दान केला तर तो इतर रुग्णांना फायदेशीर ठरत आहे.
निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधी प्रसंगी रक्त सांडू असे भाषणातून सांगत असतात, परंतु आता रक्त देऊन रुग्णांचे जीव वाचविण्याची वेळ आली असताना कोणीही पुढे आले नाही,या परिस्थितीत आमदार राहुल कुल यांनी हा नवा आदर्श घालून दिला असून कोरोनातून बरे झालेले मंत्री व आमदार याचा आदर्श घेणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.