मी फक्त ढकललं, मारहाण केलीच नाही; व्हायरल व्हिडीओवर भाजप आमदार सुनील कांबळेंचं स्पष्टीकरण
Pune News: मारहाणीच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत असूनही भाजप आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याचा इन्कार केला आहे.
Pune News: पुणे : पुण्यातील (Pune News) ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) राडा झाला असून भाजप (BJP) आमदार सुनील कांबळेनी (Sunil Kamble) राष्ट्रवादीच्या (NCP) जितेंद्र सातव (Jitendra Satav) यांच्या कानशिलात मारली आहे. उद्घाटन पाटीवर नाव नसल्यानं सुनील कांबळे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, त्यानंतर सुनील कांबळेंनी पोलीस शिपायाच्याही कानशिलात लगावली, स्टेजवरून खाली उतरताना आमदार सुनील कांबळेंनी पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मारहाणीच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत असूनही भाजप आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याचा इन्कार केला आहे. आपण कोणालाही मारहाण केली नाही, केवळ त्या कर्मचाऱ्याला बाजूला केलं, असं आमदार कांबळे यांनी म्हटलं आहे. राग प्रशासनावर होता, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं नाराज होतो, असं ते म्हणाले. मात्र मारहाण केली नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
मी फक्त ढकललं, मारहाण केलीच नाही : भाजप आमदार सुनील कांबळे
भाजप आमदार सुनील कांबळे बोलताना म्हणाले की, "मी कार्यक्रमातून बाहेर पडलो. सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला नव्हता, गोळ्या घ्यायच्या होत्या त्यामुळे घाईगडबडीत बाहेर पडलो. कार्यालयात आल्यावर मला माहिती पडलं की, हे सगळं लाईव्ह सुरू झालेलं आहे. काय झालंय हेच मला कळालं नाही, मी कोणालाच मारहाण करण्याचा संबंधच नाही. तो कोण व्यक्ती आहे, मी त्याला ओळखत नाही, मी का मारू त्याला?"
मारहाण करायची असती त्याला, तर तिथे थांबलो असतो. मी बाजूला आलो : सुनील कांबळे
"मी समोरुन स्टेजवरुन उतरत असताना तो आडवा आला, मी त्याला ढकलून बाजूला झालो आणि तिथून लगेच निघालो. वाद झाला असता, मारहाण करायची असती त्याला, तर तिथे थांबलो असतो. मी बाजूला आलो.", असं कांबळे म्हणाले. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांबाबत विचारल्यावर सुनील कांबळे म्हणाले की, "तुम्ही नीट पाहा, मी काही पाहिलेलं नाही, तुम्ही बघ खात्री करा. मारहाण करायची किंवा कानशीलात मारण्याची काय पोझिशन असते, ते नीट पाहा."
"कोणीही आरोप केला असेल, पण मी त्यांना ओळखत नाही आणि ते मला ओळखत नाही. रुपाली चाकणकरांसोबत मी चालत होतो, त्यावेळी त्यांनी म्हटलं अरे आमदारांना पुढे जाऊ द्यात. तरी ते धक्का मारत होते, तिथे जे पोलीस होते त्यांनी बाजूला नेलं खाली त्यांचं जिन्यात काय झालं मला नाही माहिती, मी कार्यक्रमात निघून गेलो.", असंही सुनील कांबळे म्हणाले. "राग प्रशासनावर काढायचा होता तर तो पत्रकारांशी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी काढण्याचा संबंध काय? मी कलेक्टरांशी बोललो, स्थानिक आमदार म्हणून कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं नाराजी होती.", असं ते म्हणाले.
नेमकं काय घडलं?
पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला भाजपच्या आदाराने कानशीलात लगावली. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्डचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. या कार्यक्रमाची पत्रिका अथवा बोर्डावर स्थानिक आमदार सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं. त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले.त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावली. जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैदकीय पक्षाच्या केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच सुनील कांबळे यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावल्याचं समोर समोर आलेय.
अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी कानशीलात लगावली. पुण्यातील ससुन रुग्णालयात हा प्रकार घडलाय. पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीय पंथीयाच्या स्वतंत्र वॉर्डचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार म्हणून आपले नाव नसल्याचे म्हणत आमदार सुनील कांबळे संतप्त झाले आणि त्यांनी सातव यांच्या कानशीलात लगावली. यानंतर सातव यांनी आपण या घटनेची माहिती अजित पवारांना देऊ अस म्हटलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पुण्यातील ससून रुग्णालयात राडा, भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला कानशीलात लगावली