Lakshman Jagpat Passed Away: भाजप आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Lakshman Jagpat Passed Away: पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Lakshman Jagpat Passed Away: पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) अनंतात विलीन झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवाय पक्षाचे कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते. आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली.
आमदार लक्ष्मण जगताप यांचं पार्थिव दुपारी त्यांच्या पिंपळे गुरव परिसरातील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद उपसभापती निलम गोरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी घरीच अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांच्या घराच्या परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.
कार्यकर्त्यांची मोठी गर्दी -
पिंपरी-चिंचडवचे लोकप्रिय नेते अशी त्यांची ओळख होती. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचा महत्वाचा वाटा होता. शिवाय त्याचा सामाजिक कार्यतही मोठा सहभाग होता. शेतकरी पुत्र असल्याने सामान्यांना ते आपल्यातले वाटत होते. त्यांच्या जाण्याने पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यासोबतच निष्ठावान, प्रेरणादायी आणि कणखर नेता म्हणूनही त्यांची ओळख होती. तरुणांमध्ये ते फार लोकप्रिय होते. त्यांच्या पार्थिवांचं दर्शन घेण्यासाठी तरुणांनी देखील गर्दी केली होती. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
शिस्तबद्ध अंत्ययात्रा -
लक्ष्मण जगताप यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा शिस्तबद्धपद्धतीने पार पडली. पिंपळे गुरव परिसरातील आणि पिंपरी-चिंचवडमधील हजारो नागरीकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. लाडका नेता गेला, अशा शब्दात अनेक शोक व्यक्त केला. त्यांच्या जाण्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सामान्यांचा आमदार -
पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरवमध्ये एका शेतकरी घरात 15 फेब्रुवारी 1963 मध्ये लक्ष्मण जगताप यांचा जन्म झाला. पिंपळे गुरव या परिसरातून त्यांनी राजकीय जीवनात प्रवेश घेतला. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, विधान परिषद सदस्य, विधानसभा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. या सगळ्या प्रवासात अनेकदा त्यांना नकार सोसावे लागले. मात्र ते हटले नाही. स्वत:च्या जोरावर कोणताही राजकीय पाठिंबा नसताना त्यांनी पुण्याच्या राजकारणात लोकप्रिय नेता म्हणून आपलं नाव कोरलं. आज त्यांच्या निधनाने पुण्यानेच नाही तर महाराष्ट्राने मेहनती आणि कष्टाळू आमदार गमावला.