Sunetra Pawar : प्रत्येकाला मान आणि प्रत्येकाचीच जाण; बारामतीत सुनेत्रा पवारांचा भला मोठा फ्लेक्स
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरत असताना प्रत्येकाला मान आणि प्रत्येकाचीच जाण या मजकुराखाली सुनेत्रा पवारांचा भला मोठा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे.
बारामती, पुणे : सध्या राज्याचं बारामती (Baramati News) लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे. पवारांच्याच बालेकिल्ल्यात यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढाई होण्याची शक्यता आहे. असं झालं तर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि सुप्रिया सुळे या नणंद- भावजय एकमेकांविरोधात लोकसभेच्या मैदानावर उभ्या ठाकणार आहेत. याच निवडणुकीसाठी अजून उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच मोठी बॅनरबाजी सुरु झाली आहे. त्यातच बारामतीत आता सुनेत्रा पावरांचा भला मोठा बॅनर अनेकांलं लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येकाला मान आणि प्रत्येकाचीच जाण, असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरत असताना प्रत्येकाला मान आणि प्रत्येकाचीच जाण या मजकुराखाली सुनेत्रा पवारांचा भला मोठा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे. त्यामुळे जवळपास सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाली आहे असं बोललं जात आहे. एकच नीती गतिमान बारामती असे देखील या फ्लेक्स वरती लिहिण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे लागलेला फ्लेक्स सध्या चर्चेचा विषय बनला.
यापूर्वी कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून सुनेत्रा पवारांचे बॅनर्सदेखील लावले होते. या बॅनर्सची चर्चा रंगली होती. शिवाय सुनेत्रा पवार मागील काही दिवसांपासून बारामती मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. त्यातच महत्वाचं म्हणजे उमेदवारीची घोषणा झाली नसली तर सुतोवाच करताना दिसत आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांनीदेखील सोशल मीडियावर स्टेट्स ठेवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळण्याची आता फक्त प्रतिक्षा आहे.
मागील अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीचा नेतृत्व सुप्रिया सुळे आणि अजित पवारांकडे असल्याचे पाहायला मिळाले. मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर आता सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असं चित्र निर्माण झालं आहे. त्यातच सुनेत्रा पवार राजकारणात मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. त्यांचा विकासरथ तयार करण्यात आला आहे. त्या मार्फत विविध विकासकामांची ओळख त्या बारामतीकरांना करुन देताना दिसत आहे. अर्थात हे सगळं चित्र पाहून सुनेत्रा पवारच लोकसभेच्या उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
इतर महत्वाची बातमी-