पुण्यात 'लेटर ऑफ क्रेडीट'चा वापर करून बँक ऑफ इंडियाची 293 कोटींची फसवणूक, आरोपीचा वर्षभरापूर्वीच मृत्यू
श्रीकांत सावईकरने बॅंक ऑफ इंडियाच्या पुण्यातील कर्वे रोड शाखेतून त्यांनी 293 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यासाठी कॅनरा बँकेच्या बनावट लेटर ऑफ क्रेडीटचा उपयोग करण्यात आला होता. श्रीकांत सवईकरने कंपनीच्या नावे काढलेले पैसे वेगळ्याच कारणांसाठी वापरल्याचं उघड झालं आहे.
पुणे : नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याप्रमाणे बनावट 'लेटर ऑफ क्रेडीट'चा वापर करुन बँकेला कोट्यवधींना फसवल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. उद्योगपती श्रीकांत सावईकरने बॅंक ऑफ इंडियाला 293 कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप आहे. मात्र श्रीकांत सावईकरचं मागील वर्षीच 22 मे 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आलं आहे. बँकेच्या फसवणुकीप्रकरणी सावईकर विरोधात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सांगलीचे असलेल्या श्रीकांत सावईकरने जवळपास 20 वर्षांपूर्वी व्हॅरोन अॅल्युमिनियम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली होती. व्हॅरोन अॅल्युमिनियम प्रायव्हेट लिमिटेड आणि व्हॅरोन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी बॅंक ऑफ इंडियाच्या पुण्यातील कर्वे रोड शाखेतून त्यांनी 293 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यासाठी कॅनरा बँकेच्या बनावट लेटर ऑफ क्रेडीटचा उपयोग करण्यात आला होता. या प्रकरणात कॅनरा बॅंकेचे अधिकारी आणि बॅंक ऑफ इंडियाचे अधिकारी यांची चौकशी देखील करण्यात आली होती.
मात्र या चौकशीची माहिती कुठेच उघड करण्यात आली नव्हती. काल सक्तवसुली संचालनालयाने याबाबत माहिती दिली. श्रीकांत सावईकर यांच्यानंतर त्यांचा मुलगा व्यंकटेश सावईकर त्यांच्या हा कंपनीचं काम पाहत आहे. सक्तवसुली संचालनालयाने त्याच्याकडेही चौकशी केली आहे. श्रीकांत सावईकर यांचे अनेक बड्या नेत्यांशी मैत्रीचे संबंध होते.
कॅनरा बँकेचं लेटर सादर करुन सावईकरने बॅंक ऑफ इंडियाकडून 293 कोटी रुपये कर्ज घेतलं होतं. कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी बॅंक ऑफ इंडियाकडून कॅनरा बॅंकेशी संपर्क साधण्यात आला असता कॅनरा बॅंकेने लेटर ऑफ क्रेडीट दिलं नसल्याचं सांगितलं. त्यानंतर बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या तक्रारीवरून सक्तवसुली संचालनालयाने तपास सुरू केला. त्यावेळी सावईकरने कॅनरा बॅंकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन बनावट लेटर ऑफ क्रेडीट तयार केल्याच उघड झालं.
व्हॅरॉन एल्युमिनियम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या पुणे, सांगली, रत्नागिरी आणि नागपूरमधील कार्यालयांवर छापे टाकून सक्तवसुली संचालनालयाने तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर सीबीआयने देखील स्वतंत्रपणे तपास सुरु केला आहे. श्रीकांत सवईकरने कंपनीच्या नावे काढलेले पैसे वेगळ्याच कारणांसाठी वापरल्याचं उघड झालं आहे.
या प्रकरणात कॅनरा बँक आणि बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. नीरव मोदी आणि मेहूल चौक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेला अशाच प्रकारे हजारों कोटी रुपयांना फसवलं होतं.