(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : निवडणुका येतील अन् जातील, पवार फक्त तुमच्यासाठी उभे; अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात बाबा आढावांची शरद पवारांसाठी बॅटिंग
Baba Adhav On Sharad Pawar : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठा संघांकडून मानपत्र अर्पण करण्यात आलं.
पुणे, पिंपरी चिंचवड: निवडणुका येतील आणि जातील, पण शरद पवारांसारखा (Sharad Pawar) माणूस नाही, त्यांना आता कशाचीही गरज नाही पण ते तुमच्यासाठी उभे आहेत असं वक्तव्य जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (Baba Adhav) यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठा संघांकडून शरद पवारांना मानपत्र अर्पण केलं गेलं. त्यानिमित्ताने बाबा आढाव यांनी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. राज्यातील सत्तासंघर्षानंतर शरद पवार हे अजित पवारांचा (Ajit Pawar) बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहेत.
बाबा आढाव म्हणाले की, निवडणुका येतील अन जातील. पण पवारांसारखा माणूस नाही. ते फक्त पाहतील लोक बरोबर आहेत ना? आता त्यांना कशाची गरज नाही, पण ते आता का उभे आहेत? तर फक्त आपल्यासाठी. तुम्ही भटक्या विमुक्तांनी त्यांचा सन्मान केला, हे तुमचं शहाणपण.
देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना बाबा आढाव म्हणाले की, इंडिया, भारत की हिंदुस्थान यावर वाद सध्या सुरू आहे. लोकांना इथं रोजगार मिळेना, दुष्काळाचे भीषण संकट आहे. लोक शहराकडे वळायला लागलेत, मग काय होणार?
Baba Adhav On Sharad Pawar : सत्तेची भूक वाढली...
माणूस सकाळी कुठं असेल अन संध्याकाळी कुठं असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना सत्तेची भूक आहे. पण लक्षात ठेवायला हवं, 140 कोटी जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं असं बाबा आढाव म्हणाले. ते म्हणाले की, काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचं राजकारण खूप विलक्षण आहे. कॅनडा मधून माझे कुटुंबीय म्हणतायेत की भारतात काय चाललंय नेमकं? आपल्या इथं फक्त सत्तेसाठी सगळं सुरू आहे.
आपापसातले किरकोळ मतभेद विसरायला हवेत. माझ्या वयाचा उल्लेख फार करू नका. माझ्या आवाजावरून कळतच असेल, मी खंबीर आहे. आता ऐका, एकजूट व्हा असं आवाहनही त्यांनी केलं. शेवटच्या घटकापर्यंत पोहचला तर लोकशाही जिवंत राहते. लोकशाहीच्या नव्या संघर्षांत तुम्ही उभे रहा. आपल्या मागण्यांच्या आधी लोकशाही टिकवून ठेवूयात असं बाबा आढाव म्हणाले.
अलिकडे देशात नथुराम गोडचेचा उदोउदो होताना दिसतोय, त्यावर बोलताना बाबा आढाव म्हणाले की, "तुम्ही कितीही कोणाचंही नाव घ्या, दुनिया गांधींचं नाव घेते अगदी ब्रिटनमध्येही त्यांचा पुतळा आहे."
ही बातमी वाचा: