Raj Thackeray Posters : सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्त्व...राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन पुण्यात पोस्टर
Raj Thackeray Posters : राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर मिळालं आहेत. त्यांनीच काही वर्षांपूर्वी रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करु देणारे हे पोस्टर्स आहेत.
पुणे : पुणेकर आणि पुणेरी पाट्या देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. अतिशय खोचक, नेमक्या आणि शब्दात असलेल्या पाट्या सगळ्याचं लक्ष वेधून घेतात. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पोस्टर पुण्यात झळकले होते. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पोस्टर पुण्यात ठिकठिकाणी लागले आहेत.
राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर मिळालं आहेत. पुण्यात जागोजागी त्यांनीच काही वर्षांपूर्वी रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करु देणारे होर्डिंग्ज लागले आहेत. आज शहरात सकाळी फेरफटका मारताना पुण्यातील अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसंच कोथरुडमधील करिष्मा चौक अशा अनेक भागांमध्ये हे होर्डिंग्ज लागलेले पाहायला मिळाले.
या होर्डिंगवर भाजप रामाचं राजकारण करतंय असल्याचं सांगत लोकांनी रामराज्य मागितले राम मंदिर नव्हे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. या पोस्टरवर लिहिलं आहे की, "राज ठाकरेंनी स्वत:च काढलेले एक व्यंगचित्र.... अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धवसाहेब ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिरला विरोध करुन व्यंगचित्र काढणारे राज ठाकरेंना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्त्व..."
दरम्यान, या पोस्टरवर मजकुरामध्ये उद्धवसाहेब म्हटलं आहे. त्यामुळे हे पोस्टर शिवसेना किंवा त्याचाच भाग असलेल्या युवासेनेने लावले असल्याची चर्चा आहे.
5 जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यावेळी त्यांनी तारीख सांगितली नव्हती. पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी रविवारी (17 एप्रिल) पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. 5 जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार असल्याचं समजतं.