Satish Wagh Case: सतीश वाघ यांची पाच लाखांची सुपारी; चार महिन्यांपूर्वीपासून आखत होते प्लॅन, संधी मिळताच साधला 'डाव', नेमकं काय-काय घडलं?
Satish Wagh Murder Case Update: सकाळी ते व्यायामासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांचं अपहरण केल्याची माहिती मिळताच वाघ यांचा मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पुणे: पुण्यातील भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हॉटेल व्यावसायिक सतीश सादबा वाघ (वय 55, रा. मांजरी बुद्रुक) यांचं अपहरण करून निर्घृन खून करण्यात आला. सतीश वाघ करण्यासाठी भाडेकरूनेच पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत चार जणांना अटक केली असून, अन्य एकजण फरार असल्याची माहिती आहे. आरोपींनी सतीश वाघ यांचे कारमधून अपहरण करून चालत्या कारमध्ये धारदार चाकूने गळ्यावर तब्बल 72 वेळा वार करून त्यांचा खून केला. सकाळी ते व्यायामासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांचं अपहरण केल्याची माहिती मिळताच वाघ यांचा मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश वाघ यांची चार महिन्यांपूर्वी सुपारी
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय जावळकर हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. तर, पवन शर्मा याने नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या दोघांना सोबत घेऊन सतीश वाघ यांचा खून केला. जावळकर हा पूर्वी वाघ यांच्याकडे भाड्याने राहत होता. वैयक्तिक कारणातून दोघांमध्ये वाद होता. याच कारणातून जावळकरने वाघ यांना संपवण्याचं ठरवलं. शर्मा आणि जावळकर पूर्वी एका ठिकाणी कामाला होते. दोघांची चांगली ओळख होती. जावळकर याने शर्माला वाघ यांचा जीव काढण्यासाठी मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी पाच लाखांची सुपारी दिली असल्याची माहिती आहे. तेव्हापासून, शर्मा संधीच्या शोधात होता. मात्र, संधी मिळत नव्हती.
चार ते पाच दिवसांपूर्वी चौघे परत एकत्र आले. त्यांनी वाघ यांचा काटा काढण्याचं नव्याने प्लॅनिंग केलं. इतकंच नाही तर रेकी करण्यापासून गाडी कशी वापरायची, हे देखील ठरवलं. जावळकर याच्याकडून शर्मा याने सुपारीतील काही पैसे अॅडव्हान्स म्हणून घेतले. रविवारी (दि. 8) रात्री शर्मा, गुरसाळे आणि शिंदे या तिघांनी नियोजन करून अन्य एका चौथ्या साथीदाराला सोबत घेऊन सोमवारी (दि. 9) सकाळी सव्वासहाच्या सुमारास वाघ यांना मार्निंग वॉक करत असताना अपहरण केलं. पुढे चालू गाडीत वाघ यांना चाकूने भोसकून त्यांचा खून केला. मृतदेह शिंदवणे घाटात टाकून चौघांनी पळ काढला होता. या प्रकरणात अन्य कोण सहभागी आहे का तसेच आरोपींनी पैशांची देवाणघेवाण कशी केली, याबाबत पोलिस तपास करत आहेत.
तब्बल 72 वेळा चाकूने भोसकसून खून
वाघ यांच्या अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. मात्र, सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास केला.