(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravindra Dhangekar : पुण्यात महाविकास आघाडीत धूसफूस सुरुच; उद्धव ठाकरेंच्या सभेवरुन पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी
महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या सभेवरुन पुणे कॉंग्रेसमध्ये आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वादावादी झाल्याचं दिसून आलं आहे.
पुणे : पुण्यातील महाविकास आघाडीतील बिघाडी (Mahavikas aghadi) पुन्हा एकदा समोर आली आहे. महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचाराच्या सभेवरुन पुणे कॉंग्रेसमध्ये (Congress) आणि ठाकरे गटात (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा वादावादी झाल्याचं दिसून आलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवा नेते आदित्य ठाकरे यांची कोथरूडमध्ये सभा घेण्यावरून हा वाद झाला असल्याची माहिती आहे. कोथरुडमध्ये सभा घेतली तर येत्या काळात विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत कोथरुडच्या जागेची मागणी होणार, अशी शक्यता असल्याने कोथरुडमध्ये सभा घेण्याला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.
महाविकास आघाडीकडून सध्या रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या सभेसाठी किंवा रोड शोसाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी रोज बैठका घेऊन निर्णय घेतले जात आहे. मात्र याच बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये धूसफूस होत असल्याचं चित्र आहे. सगळ्या सभा किंवा रोड शो फक्त धंगेकरांच्या प्रचारासाठीच नाही तर येत्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीची गणितं समोर ठेवून सभेचं किंवा रोड शोचं आयोजन करण्यात येत आहे.
कोथरुडमधील सभेवरुन वाद
काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची सभा घ्यावी, अशी मागणी केली. मात्र यावरुनच पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. येत्या निवडणुकीत ठाकरेगटाकडून जागेसाठी दावा केला जाईल, असं कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कोथरुडसंदर्भातच नाही तर संगमवाडी, बोपोडी की मुळा रोड परिसरात आयोजित केलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेवरुनही वाद झाल्याची माहिती आहे.
कसबा द्या; ठाकरे गटाची मागणी
रवींद्र धंगेकरांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्याची ठाकरे गटाने विधानसभेसाठी कसबा देण्याची मागणी केली होती. जर कसबा दिला तरच रवींद्र धंगेकरांचा प्रकार करु, असा आक्रमक पावित्रा ठाकरे गटाने घेतला होता. कसबा विधानसभा मतदारसंघ देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच प्रचारात सहभागी होणार असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गट रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात उतरले. आता रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते पुण्यात येणार आहे. त्यावरुनदेखील कॉंग्रेस आणि ठाकरे गटाच तू तू मै मै होताना दिसत आहे. येत्या काळात उद्धव ठाकरेंची सभा कुठे होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
माधवराव शिंदेंच्या मृत्यूबाबत उदयनराजेंचं मोठं विधान, काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले...