Pune Rain News: अतिवृष्टीचा अंदाज असताना पुण्यात पावसाने घेतला 'ब्रेक'; शहरात ढगाळ वातावरण
पुण्यात मागील सात दिवसांपासून रेड अलर्ट असल्याने मुसळधार पाऊस पडला मात्र आज सकाळपासून पुण्यात पावसाने ब्रेक घेतला आहे. शहरात ढगाळ वातावरण आहे.
Pune Rain News: पुण्यात मागील सात दिवसांपासून रेड अलर्ट असल्याने मुसळधार पाऊस पडला मात्र आज सकाळपासून पुण्यात पावसाने ब्रेक घेतला आहे. शहरात ढगाळ वातावरण आहे. रिमझिम पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे मुसळधार पावसापासून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आजपासून पुढील दोन दिवस हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवली होती. मात्र शहरात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र आहे
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने मुठा नदी दुथडी वाहत आहे. शिवाय नदीपात्रातील रस्ते बंद करण्यात आले आहे. दरवर्षी पुण्यातील नदीपात्रात असंच चित्र असतं. त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्ता वापरावा लागतो आणि वाहतुक कोंडीचाही सामना करावा लागतो.
दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने दर्शवला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानूसार आज-उद्या शाळा बंद असणार आहे. पुण्यातील पावसाची परिस्थिती पाहून शाळेबाबत प्रशासन पुढील निर्णय घेतील असंही प्रशासानाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. पुणे जिल्ह्यातील 14 व 14 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 14 जुलै ते 16 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले होते.
त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवरील अपघात आणि गर्दी पाहता किल्ले आणि पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यात हवेली तालुक्यातील सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक, मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, ड्युक्स नोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधीवरे खिंड, पवना परिसर, राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा, कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी परिसर, मुळशी तालुक्यातील अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड, भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला, वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर, मढेघाट, जुन्नर तालक्यातील किल्ले जीवधन, आंबेगाव तालुक्यातील बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बैलघाट, शिडीघाट, गणवतीमार्गे) या ठिकाणी असलेले किल्ले, धबधबे, तलाव किंवा धरण या ठिकाणांच्या सभोवताली एक किलोमीटर परिसरात 17 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आदेश लागू राहणार आहेत.