Pune Flood : पुण्यात कमरे इतक्या पाण्यात उतरुन काम, शाबासकी ऐवजी निलंबन, संदीप खलाटेंवरील कारवाईने आश्चर्य!
Pune Flood Update : पुण्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी कमरे इतक्या पाण्यात उभे राहून प्रयत्न करणाऱ्या संदीप खलाटे यांना शाबासकी देण्याऐवजी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Pune Flood Update : पुण्यातील बुधवारी उद्भवलेल्या पूर (Pune Flood) परिस्थितीचे खापर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे (Sandeep Khalate) यांच्यावर फोडण्यात आलंय. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी कमरे एवढ्या पाण्यात उभे राहून प्रयत्न करणाऱ्या संदीप खलाटे यांना शाबासकी देण्याऐवजी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्ता (Sinhgad Road) परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) परिसरात जाऊन पाहणी केली होती. यावेळी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यानंतर पूरस्थितीचे खापर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फोडण्यात आले आहे.
पुण्यातील एकतानगरमध्ये शिरले होते पाणी
पुण्यातील खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) अचानक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये (Ekta Nagar) पाणी शिरले. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे हे मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी दिवसभर एकता नगरमध्ये स्वतः पावसांत उभे राहून परिस्थिती हाताळत होतो. अनेकदा पाण्याच्या प्रवाहात उतरुन त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.
स्वतः पाण्यात उतरणाऱ्या अधिकाऱ्यावर फोडलं खापर
या पुरस्थितीला नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे, जलसंपदा विभाग आणि महापालिकेचा आपत्ती निवारण कक्षातील संवादाचा अभाव कारणीभूत ठरलेला असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच केलेला असताना त्याचे खापर पूर परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः पाण्यात उतरणाऱ्या अधिकाऱ्यावर फोडण्यात आल्याची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे. संदीप खलाटे हे स्वतः त्या दिवशी पाण्यात उतरून मदतकार्य करत असल्याचे दिसून आले होते. सहाय्यक आयुक्तांबरोबरच उपायुक्त संजय शिंदे यांचाही पदभार काढून घेण्यात आला आहे.
खडकवासला धरणातून 25 हजार 36 क्यूसेकने विसर्ग
दरम्यान, खडकवासला धरण साखळीत (Khadakwasla Dam) मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून पुन्हा एकदा विसर्ग करण्यात येत आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोमवारी सकाळी 9 वाजता 22 हजार 880 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र दुपारी 12 वाजता विसर्ग वाढवून 25 हजार 36 क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आणखी वाचा