पुण्यात गुन्हेगारांना मोकाट रान; नाना पेठेनंतर हडपसरमध्ये कोयत्याचे वार करुन फायनान्स मॅनेजरला संपवलं
हडपसर भागात वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची रात्री अडीच वाजता हत्या करण्यात आली आहे. कुलकर्णी हे पुण्यातील एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते.
पुणे : पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे. पुण्यात (Pune Crime News) बारा तासात दुसरा खून झाला आहे. काल एकाच दिवशी दोघांची हत्या झाली आहे. मरण पावलेल्यांमध्ये एक माजी नगरसेवक तर दुसरा फायनान्सर आहे. फुरसुंगी सासवड रोड पोलीस ठाण्यापासून तीनशे मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. कोयत्याने वार करुन निर्घृण खून करण्यात आला आहे. कुलकर्णी हा एक फायनान्स कंपनी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे. व्याजाने दिलेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यता आहे.
हडपसर भागात वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची रात्री अडीच वाजता हत्या करण्यात आली आहे. कुलकर्णी हे पुण्यातील एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. गाडीतळ परिसरात असलेल्या त्यांच्या घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने धारदार शस्त्राने कुलकर्णी यांचा खून करण्यात आला आहे. खुनानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा पुण्यात खूनाची घटना घडली आहे. खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय?
सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सध्या खरंच ऐरणीवर आलाय.. पुण्यात एकाच दिवशी कोयत्याने वार करुन दोघांची हत्या करण्यात आली आहे. पुण्यात खून, दरोडेखोरी, चोऱ्या या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसापासून अगदी क्षुल्लक कारणांवरून वाद झाला आहे. खून मारामारी होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत.
वनराज आंदेकरांवर गोळीबार
पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. याचं सीसीट्वही माझाच्या हाती लागलंय. एवढंच नाहीतर गोळीबारानंतर वनराज आंदेकरांवर कोयत्यानं सपासप वारही केले. हल्लेखोरांनी आंदेकरांवर तब्बल पाच गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले. दरम्यान पुणे पोलिसांनी गोळीबारप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलंय. घरगुती वादातून निकटवर्तीयाकडून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार झाल्याची घटना नाना पेठेत घडली.
हे ही वाचा :
पाच राऊंड फायर केले, पण एकही गोळी लागली नाही...; मग वनराज आंदेकरांचा मृत्यू नेमका कसा झाला?, मोठी माहिती समोर