पाच राऊंड फायर केले, पण एकही गोळी लागली नाही...; मग वनराज आंदेकरांचा मृत्यू नेमका कसा झाला?, मोठी माहिती समोर
Vanraj Andekar Pune Crime: एका मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून जात हल्लेखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.
Vanraj Andekar Pune Crime: पुण्यातील नाना पेठेत रविवारी पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी कोयत्याने देखील वार केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोर दुचाकी घेऊन आले. यावेळी एका मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या अंगावर धावून जात हल्लेखोरांनी गोळीबार (Pune Crime News) करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. सदर घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलं आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकही गोळी लागली नाही, पण...
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील हल्ला केल्यानंतर काहीजण दुचाकीवरुन पुन्हा खाली उतरत कोयता घेऊन वनराज आंदेकर यांच्या दिशेन धाऊन जात असल्याचे दिसत आहे. सदर घटनेनंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, वनराज आंदेकर यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून, कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे.
सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय?
सदर घटनेचं भयानक सीसीटीव्हीचं फुटेज समोर आलं आहे. नाना पेठेत वनराज आंदेकर आणि त्यांच्यासोबत एक जण उभे होते. यावेळी जवळपास सात दुचाकीवरुन जवळपास 14 ते 15 जण येतात आणि वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतंय. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करुन सर्व घटनास्थळावरुन पळ काढतात.
कोण आहे वनराज आंदेकर?
वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते.
नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा-
आंदेकर टोळी गेली पंचवीस वर्ष पुण्यात गुन्हेगारी कारवाया करत असून प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खुनाच्या प्रकरणी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा ही झालेली आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरविरुद्ध 1985 पासून खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुण्यातील फरासखाना, खडक व समर्थ या पोलीस ठाण्यात, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.