Ajit Pawar On Anjali Damania : माझ्या कार्यकर्त्यानेही चूक केली तर टायरमध्ये घाला असं मी पोलिसांना सांगतो, पण काहीजण माझ्यावरच घसरले; अजितदादांचा दमानियांना टोला
माझ्या कार्यकर्त्यानेही चूक केली तर टायरमध्ये घाला असं मी पोलिसांना सांगतो, पण काहीजण माझ्यावरच घसरले, असा टोला अजित पवारांनी अंजली दमनिया यांना लगावला आहे.
पुणे : पुणे अपघात प्रकरणावरुन गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यासोबत त्यांनी विविध आरोपदेखील केले होते त्यानंतर आता अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. काहीजण तर माझ्यावरच घसरले आहेत. माझ्या कार्यकर्त्यांनी चूक केली तर त्यांना टायरमध्ये घ्या आणि संबंधितांवर कारवाई करा, असं मी अधिकाऱ्यांना सांगतो. मात्र काही जण माझ्यावरच घसरले म्हणत अजित पवारांनी नाव न घेता अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधला आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी निशाणा साधला आहे.
अजित पवार म्हणाले की, माझा कार्यकर्ता चुकला आणि त्याने जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्या कार्यकर्त्याला सोडू नका. त्याला टायरमध्ये घाला आणि त्याच्यावर आणि संबंधितांवर कारवाई करा, असं मी नेहमी सांगत असतो. मात्र या प्रकरणावरुन काही जण माझ्यावरच घसरले आहेत.
स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे शंकेने बघितले जातंय, असं पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, चौकशी करु द्या ना, मी पण बारामतीचा 32 वर्षांपासून आमदार आहे. आम्ही कामामुळे मुंबईत असतो, कधी पुण्यात असतो. मी मतदार संघात नसतो. जे आमदार असतात, ते बहुतेक त्यांच्या मतदारसंघात असतात. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात एखादी घटना घडल्यास त्यांना संबंधित ठिकाणी जावं लागतं, असं म्हणत नाही त्यांनी सुनिल टिंगरेंची बाजू घेतलीये.
अंजली दमानिया काय म्हणाल्या होत्या?
राजकारणावर आम्ही नागरिक म्हणून बोलत राहणार आहोत. तुम्ही राजकारणी म्हणून त्याची उत्तर द्यायलाच पाहिजेत. तुम्ही म्हणत आहात माझ्या सेल फोनची तपासणी करायची आहे. तर माझा सेलफोन हवा तेव्हा घेऊन जावा. जे सीडीआर काढायचे आहेत, ते काढा. ज्याची चौकशी करायची आहे ती करा. पण तुमच्या अजित पवारांची चौकशी त्याच्या फोनची चौकशी आणि त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे, असं अंजली दमानिया म्हणाल्या होत्या. पुणे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल अग्रवाल यांचे अजित पवारांशी संबंध असल्याचा आरोपही अंजली दमानिया यांनी केला होता.