Chitale : चितळे बंधूंच्या नावावर पुण्यात बनावट बाकरवडीची विक्री, 'चितळे स्वीट होम'वर गुन्हा दाखल
Chitale Bandhu Bakarwadi : चितळे बंधू मिठाईवाले कंपनीच्या नावे असलेला ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स वापरुन बनावट बाकरवडीची विक्री केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यात चितळे बंधूंचे (Chitale Bandhu Mithaiwale) नाव वापरत, हुबेहुब पाकीट आणि इतर माहिती वापरत दुसऱ्याच चवीच्या बाकरवाडीची (Chitale Bakarwadi) विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांची आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसात करण्यात आली आहे. चितळे बंधू मिठाईवाले कंपनीचे इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी यांनी ही तक्रार दिली आहे. त्या आधारे पुणे पोलिसांनी 'चितळे स्वीट होम'वर गुन्हा नोंदवला आहे.
सर्व माहिती सारखीच वापरली
चितळे स्वीट होम यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांचे असल्याचे भासवून, नावाचा गैरवापर करुन फसवणूक केली असं या तक्रारीत म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लॉन्ट आहे. याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवि कॉलनी मुकुंदनगर याठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिटस् आहेत.
चव बदलल्याच्या अनेक तक्रारी आल्या
गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाखरवडीची चव बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची दखल घेत फिर्यादी यांनी बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून 'चितळे स्वीट होम' नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी केली. चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे आणि चितळे बंधूंच्या नियमीत तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली.
खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचे फिर्यादी यांना आढळून आले. तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी customercare@chitalebandhu.in कस्टमर केअर नंबर 9922944482, व वेबसाईट www.chitalebandhu.in डिटेल्स हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसून आले.
अशाप्रकारे 'चितळे स्वीट होम'चे प्रोपा प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधु मिळाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर वापरले. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करुन चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे.
तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता कलम 318(2), 350, 66(सी), 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























