PCMC | पिंपरी चिंचवड महामालिकेच्या स्थायी समितीवरील ACB च्या कारवाईवर अजित पवार म्हणतात..
पिंपरी चिंचवड महामालिकेच्या (PCMC) स्थायी समितीवर (standing committee) एसीबीने कारवाई केली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पिंपरी चिंचवड : कोणी कोणाचा राजीनामा घ्यावा हा त्या-त्या पक्षाचा संबंध आहे. पण पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं. हे शहरवासीय उघड्याने डोळ्याने हे पाहतायेत. भाजपची महापालिकेत सत्ता असताना हा प्रकार घडलाय. वास्तविक पाहता मी सुद्धा या शहराचे वीस वर्षे नेतृत्व केलं. पण अशा गोष्टी घडू दिल्या नाहीत. त्यातूनही यदाकदाचित असे प्रकार नजरेस आले तर मी संबंधितांवर कडक कारवाई करताना मागे पुढं पाहिलं नाही. कारण जनतेच्या कररूपातून आलेला हा पैसा असतो, त्यावर असा डल्ला मारण्यासाठी कोणी पुढाकार घेत असतील तर हे पिंपरी चिंचवडचे दुर्दैव्य आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
कोणीही असो, चौकशीत ते समोर येईल. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत अधिकच भाष्य करणं योग्य होणार नाही. पण ते राष्ट्रवादीशी संबंधित असतील तर आम्ही योग्य ती कारवाई नक्की करू. राजू शेट्टी यांचे नाव वगळले ही अफवा आहे. काल पण माझ्या बाबतीत अशाच वावड्या उठवल्या, असेही पवार म्हणाले.
छोट्या बँका मोठ्या बँकेत मर्ज करण्याचं केंद्राचं धोरण
छोट्या बँका मोठ्या बँकेत मर्ज करायच्या असं धोरण केंद्राचे आहे. परंतु, देशपातळीवर याला विरोध होत असल्याने ते आक्रमकपणे पुढे गेलेले नाहीत. राष्ट्रीयीकृत बँकेत कोणकोणाला ओळखत नाही, अशावेळी सहकारी बँकेचा लोकांना फायदा होतो. शेतकऱ्यांना सेवा देताना राष्ट्रीयकृत बँकेचे हात आखडते येतात.
वॉर्ड की प्रभाग रचना?
आत्ताच्या सूचना वॉर्ड प्रमाणेच आहेत. निवडणूक आयोगाने तशा सूचना दिल्यात. पण प्रभाग एकच असावा की प्रभाग दोन, तीन अथवा चार हा निर्णय राज्य सरकारच घेणार आहे. आणि कधी ही मंत्रिमंडळात तो निर्णय आम्ही घेऊ शकतो. आज एक-एक वॉर्डची रचना होईल. पुढे जाऊन जसं ठरेल तसे वॉर्ड जोडले जातील आणि त्याचा प्रभाग बनवता येईल. तसा निर्णय तिन्ही पक्ष मिळून लवकरच घेतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.