Pune News: पहिल्याच पावसाचा निसर्गाला झटका; पुण्यातील 30 ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना
Pune News: पहिल्याच पावसाचा पुण्यातील निसर्गाला झटका बसला आहे. पुण्यातील विविध परिसरात 30 झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाडं हटवण्याचं काम सुरु आहे.
Pune News: पुणे शहर परिसराला सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. यादरम्यान 30 ठिकाणी झाडे पडली, तर काही झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्या. यामुळे बहुतांश ठिकाणी दुपारपासून वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
पुणे शहरात मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी 30 जागी झाडे पडल्याच्या नोंदी अग्निशमन दलाकडे आल्या होता. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाडे हटविण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील पर्वती शाहू कॉलनी, जीपीओ, पोलिस आयुक्तालय(20 ते 25 दुचाकी),भवानी पेठ बीएसएनएल ऑफिस, प्रभात रोड, औंध आंबेडकर चौक, राजभवन जवळ, गुरुवार पेठ पंचहौद, कोंढवा शिवनेरी नगर, एनआयबीएम रोड, काञज कोंढवा रोड, नवी पेठ पञकार भवन, राजेन्द्र नगर, पर्वती स्टेट बँक कॉलनी, एसटी कॉलनी स्वारगेट , कोंढवा आनंदपुरा हॉस्पिटल या सगळ्या परिसरात झाडे पडण्याच्या तक्रारी आल्या होत्या.
परभणी शहरात देखील पावसाने झाड पडल्याची घडना दोन दिवसांपुर्वी घडली होती. यात रस्त्यांवरुन वाहनांची रहदारी असताना अचानक झाड पडले होते. दोन दुचाकी आणि एका ऑटोवर हे झाड पडलं होतं.
अचानक संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ढग गडगडले आणि पुण्यात पावसाने हजेरी लावली . अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाळी. पुण्यातील जंगली महाराज रोजला पहिल्याच पावसाने झोडपून काढल्याचं चित्र आहे. पहिल्याच पावसात शहरात अनेक ठिकाणी पाणीसुद्धा साचलं आहे. दरवर्षीपेक्षा यंदा पुणे जिल्ह्यात दोन महिने उन्हाचा चांगलाच तडाखा होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता अखेर मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अडकलेली मान्सूनची (Monsoon) गाडी रूळावर आली असून मान्सूननं हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यासोबतच राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. यातच पुणे, पिंपरी-चिंचवड मधील अनेक परिसरात पावसाच्या कुठे हलक्या तर कुठे मुसळधार सरी बघायला मिळाल्या.