धाराशिवमध्ये 'मशाल' पेटणार की अलार्म वाजणार ?; एक्झिट पोलमधून कोणाचा उडाला 'धुरळा'
उस्मानाबादचे नामांतर झाल्यानंतरची आणि शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे.
धाराशिव : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांवर झालेल्या मतदानानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. वेगवेगळ्या एक्झिट पोलमधून (Exit Poll) देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसून येते. तर, महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसत असल्याचा अंदाज आहे. विविध संस्था आणि माध्यम समुहांच्या एक्झिट पोलनुसार ABP News-CVoter च्या अंदाजानुसार राज्यात फिफ्टी-50 जागांवर आघाडी असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार, महायुती 24, महाविकास आघाडी 23 आणि इतर 1 जागांवर आघाडीचा अंदाज आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात अटीतटीची व चुरशीची लढत झालेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना आघाडी असल्याचे टिव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमधून दिसून येते.
उस्मानाबादचे नामांतर झाल्यानंतरची आणि शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे, धाराशिवकरांसाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काय होणार हे महत्त्वाचे आहे. त्यातच, ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या ओमराजे निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा मतदारसंघातून शिवसेनेनं महाविकास आघाडीची उमेदवारी दिली होती. तर, राष्ट्रवादीने महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. येथील निवडणुकीसाठी महायुतीकडून लवकर उमेदवाराची घोषणा होत नव्हती. त्यामुळे, येथील मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतो की काय, अशीही चर्चा निवडणूक पूर्व झाली. मात्र, राष्ट्रवादीने ही जागा आपल्याकडेच ठेवली. त्यानंतर, येथून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीनेही माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, एक्झिट पोलनुसार येथील मतदारसंघात राष्ट्रवादी व वंचितचे उमेदवार पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
'टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स' च्या एक्झिट पोलनुसार उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, धाराशिवमध्ये पुन्हा एकदा शिवसेना खासदारच आघाडीवर असल्याचं चित्र आहे. गेल्या 20 वर्षंचा राजकीय इतिहास पाहता, शिवसेनेनं दर पंचवार्षिक निवडणुकीत येथील उमेदवार बदलला आहे. मात्र, यंदा विद्यमान खासदारांनाच तिकीट दिलं. तर, गतवेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना ठाकरेंच्या उमेदवारासाठी येथे प्रचार केला होता. मात्र, यंदा राष्ट्रवादी अजित पवारांच्या उमेदवारासाठी मोदींनी सभा घेतली. तर, ओमराजे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख प्रचाराच्या मैदानात दिसून आले.
6 मतदारसंघात 5 ठिकाणी महायुती प्रबळ
धाराशिव लोकसभा मतदारसंघात बार्शी, तुळजापूर, उस्मानाबाद, औसा, उमरगा आणि भूम-परांडा-वाशी या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या 6 पैकी 5 मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत. तर, केवळ कळंब मतदारसंघात कैलास पाटील हे शिवसेना महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे, महायुती प्रबळ असून ओमराजे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्येक मतदारसंघातील थेट जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी आघाडी घेतल्याचं टीव्ही 9 च्या एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे.
63 टक्के मतदान
दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघात 63 टक्के मतदान झाले असून यंदा 6 विधानसभा मतदारसंघात मिळून जवळपास 70 हजार मतदान वाढले आहे. या वाढलेल्या मतदानाच नेमका फायदा कोणाला झाला, या प्रश्नाचे उत्तर 4 जून रोजीच मिळणार आहे. मात्र, तुर्तास आलेल्या एक्झिट पोलनुसार ओमराजे निंबाळकर यांना आघाडी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12
(Disclaimer : ABP C व्होटर एक्झिट पोल सर्वेक्षण 19 जून ते 1 जून 2024 दरम्यान घेण्यात आला. त्याची सँपल साईज ही 4 लाख 31 हजार 182 इतकी आहे आणि हे सर्वेक्षण सर्व 543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आले. त्यामध्ये देशातील 4,129 विधानसभा जागांचा समावेश आहे. ABP C व्होटर सर्वेक्षणाचे त्रुटीचे मार्जिन राष्ट्रीय स्तरावर +3 आणि -3 टक्के तर प्रादेशिक स्तरावर +5 आणि -5 टक्के इतकं आहे.)
हेही वाचा
देशात भाजपा आघाडी 350 पार, महाराष्ट्रात जागा घटल्या; Republic च्या एक्झिट पोलमध्ये मविआला किती जागा?