आदित्य ठाकरे वरळीत उभा राहतात की, घाबरुन दुसरा मतदारसंघ शोधतात?; ठाकरे-शिंदे पुत्रांमध्ये जुंपली
लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवला, तो नॅरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही. संविधान खतरे मे, संविधान बचाव अशा सगळ्या खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून हे एकगट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) अपेक्षित यश मिळालं नसलं तरीही त्यांचे 7 उमेदवार निवडून आल्याने शिंदे गटाचा उत्साह वाढला आहे. त्यातच, ठाणे, कल्याणसह मुंबईतील एका जागेवरही शिवसेना शिंदे गटाने बाजी मारल्याने आता मिशन मुंबईचा नारा महायुतीकडून दिला जात आहे. त्यातच, मुंबई सर्वात चर्चेत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात यंदा आदित्य ठाकरेंना कोणाचं आव्हान असणार यावरुन चर्चा रंगली आहे. एकीकडे मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांनीही वरळी विधानसभा मतदारसंघातील लोकसभेच्या मतदाना आकडेवारीवरुन आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरेंच्या (Aadity Thackeray) वरळी मतदारसंघातून शिवसेनेला केवळ 6 हजारांची लीड असल्याचं त्यांनी म्हटलंय.
लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवला, तो नॅरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही. संविधान खतरे मे, संविधान बचाव अशा सगळ्या खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून हे एकगट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं. त्यामुळे त्यांचा विजय झाला असेल. मात्र, ही टेम्पररी गोष्ट आहे, ही पर्मनंट अरेंजमेंट नाही. लोकांची दिशाभूल करुन लोकांचं मतदान मिळवलं, असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमध्ये केला. कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी पराभवावर भाष्य केलं. लोकांची दिशाभूल एकदा करु शकता, वारंवार दिशाभूल होत नसते. आगामी विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा महायुती सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला.
श्रीकांत शिंदेंनी वरळी मतदारसंघातील पराभवावर भाष्य करताना आदित्य ठाकरे आता दुसरा मतदारसंघ शोधतील, असेही म्हटले. वरळी विधानसभा मतदारसंघात 40 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असं त्यांना वाटत होतं. मात्र, लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली, वरळी मतदारसंघात फक्त 6 हजार मताधिक्य मिळालं आहे. मराठी माणूस त्यांच्यासोबत आहे, असं त्यांना वाटत होतं. मात्र, मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या, धनुष्यबाणाच्या आणि बाळासाहेबांच्या बाजुने उभा राहिला. मराठी माणसाने मतपेटीतून हे दाखवून दिलं, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. तसेच, 19% जे मतदान शिवसेनेला होत होतं. त्यातील साडेचौदा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला म्हणजेच धनुष्यबाणाला पडलंय, असे श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. तसेच, आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की, घाबरुन दुसरा मतदारसंघ शोधतात हे पहावं लागेल, असेही शिंदेंनी म्हटलं.
हाच एक मोठा प्रश्न
विधानसभेला वरळीत कमळ फुलणार नाही, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं होतं. त्यावरुन बोलताना श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. पुढच्या वेळेस आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की, घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हाच एक मोठा प्रश्न आहे, असे श्रीकांत शिंदेंनी म्हटले.